नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अशीच एक भयंकर घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे भोपाळमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा पथकातील कर्मचाऱ्याने अशी अचानकपणे हत्या केल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. आत्महत्येमागचं कारणही अद्याप अस्पष्ट आहे. अजय सिंह असं आत्महत्या केलेल्या कॉन्स्टेबलचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय सिंह हे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सुरक्षा पथकात गेल्या सहा महिन्यांपासून तैनात होते. अजय हे बुधवारी (30 जून) नेहमीप्रमाणे सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी ड्युटीवर तैनात होणार होते. ते ड्यूटीवर नेहमी वेळेवर हजर राहायचे. मात्र, बुधुवारी सकाळी बराच काळ उलटून गेला तरी ते आले नव्हते. त्यामुळे सिक्योरिटी ऑफिसमधून अजय यांना फोन करण्यात आला. मात्र, अजय फोन उचलत नव्हते. यानंतर ऑफिसमधून अजय यांच्या नातेवाईकांना फोन लावण्यात आला. नातेवाईकांनी भोपाळमध्ये राहत असलेल्या नातेवाईकांना फोन करुन अजयच्या घरी जावून चौकशी करण्यास सांगितलं.
अजय यांचे भोपाळमधील एक नातेवाईक त्यांच्या घरी पोहोचले. तिथे पोहोचल्यावर घराचा दरवाजा आतमधून लॉक आहे हे अजय यांच्या नातेवाईकाला लक्षात आलं. त्यांनी घराच्या मागच्या बाजूने घरात पाहिलं तर त्यांना धक्का बसला. कारण त्यांच्यासमोर अजय यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. अजय हे मुळचे मध्य प्रदेशच्या विदिशा येथील शमशाबादचे रहिवासी होते. ते नोकरीनिमित्त भोपाळ येथे राहत होते. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलगीही भोपाळमध्ये वास्तव्यास होते. पण एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची पत्नी आणि मुलगी विदिशा येथे गेले होते.
अजय देखील सुट्टी घेऊन संबंधित कार्यक्रमासाठी जाणार होते. सर्व सुरळीत सुरू असताना अजय यांनी आत्महत्या केली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजय यांच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी अजय यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. अजय यांनी त्यांच्या सर्व्हिस रिवॉल्वहरने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. पोलीस सध्या त्यांच्या भावाचा जबाब नोंदवत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.