पुणे : मुळशी तालुक्यातील ताम्हिणी गावाजवळ मुगाव खिंड येथे पेट्रोल टाकून अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळालेल्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात १५ दिवसांनंतर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे़. याप्रकरणी ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे़. श्रीधर सत्यप्पा गाडेकर (रा़.नऱ्हे ) असे खुन झालेल्याचे नाव आहे़. मल्लिकार्जुन सोमलिंग बिराजदार (वय ३८, रा़ उजवी भुसारी कॉलनी, पौड) याला अटक करण्यात आली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, ताम्हिणी गावाजवळील मुगांव खिंड येथे एका पुरुषाचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह २६ फेब्रुवारी रोजी आढळून आला होता़. याचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश मुंढे व त्यांच्या सहकाऱ्यांना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या बेपत्तामधील व्यक्तीशी मिळते जुळते असल्याचे आढळून आले़. त्यावरुन हा मृतदेह श्रीधर गाडेकर यांचा असल्याचे निष्पन्न झाले़. गाडेकर हा महिलांची छेडछाड करीत असल्यामुळे मल्लिकार्जुन बिराजदार याने २५ फेब्रुवारीला मोटारीतून गाडेकर याला मुगाव खिंडीत नेले़. गाडीत मारहाण करुन त्यांना बेशुद्ध केले़. तेथे त्यांच्या डोक्यात दगड घालून खुन केला़. त्यानंतर गाडीतील पेट्रोल टाकून पेटवून दिले होते़. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बिराजदार याला अधिक तपासासाठी पौड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे़.