मुंबई - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी व्हॉट्स अॅपवर मिळाली होती. याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर शोध सुरू झाला. त्यानंतर, आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. कमरान अमीन खान (वय २५), असे या आरोपीचे नाव असून मुंबई एटीएसने दोन दिवसांच्या आत ही कारवाई केली आहे.
उत्तर प्रदेशच्या पोलीस मुख्यालयाच्या व्हॉट्स अॅप नंबर UP ११२ यावर गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता एक मेसेज आला. या मेसेजमध्ये, मी मुख्यमंत्री योगी यांना बॉम्बने उडवून देणार आहे, ते समाजचे शत्रू आहेत असं लिहिलं होतं. हा मेसेज आल्यानंतर पोलीस दलात खळबळ माजली होती. धमकीचा हा मेसेज 8828453350 या मोबाईल क्रमांकावरून आल्याचं पोलिसांना आढळलं. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी संबंधित मोबाईल नंबरचे तपशील शोधायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे गोमती नगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी धीरज कुमार यांनी तक्रार दाखल केली होती. सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी याबाबत तपास सुरु केला. तर, सायबर सेलच्या मदतीने या सायबर गुन्हेगाराचा तपास करुन अखेर आरोपीला अटक करण्यात आली.