जमीर काझीमुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एखाद्या अधिकाऱ्याच्या तोऱ्यात ताब्यात घेऊन जाणाऱ्या किरण प्रकाश गोसावीमुळे अमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) अडचणी आणखी वाढणार आहेत. गोसावीच्या विरुद्ध मुंबईसह तीन ठिकाणी फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल असून तो पुण्यातील एका गुन्ह्यात फरारी आरोपी असल्याची बाब समोर आली आहे. गंभीर गुन्हे आणि फरारी आरोपीला महत्त्वाच्या कारवाईत मुख्य साक्षीदार बनविण्याची चूक त्यांना नडण्याची शक्यता आहे.
गोसावी कार्डेलिया क्रूझवरील कारवाईवेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या बरोबरीने सहभागी असल्याचे उपलब्ध व्हिडीओ व फोटोवरून दिसून येते. आर्यन खानला दंडाला पकडून नेताना तसेच त्याच्या समवेत सेल्फी घेणारा गोसावी हा एखादा अधिकारी असावा असा समज झाला होता. त्यामुळे एनसीबीने सोमवारी तो खासगी व्यक्ती असून त्याचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. बुधवारी राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी त्याचा व भाजपचा पदाधिकारी मनीष भानुशाली यांचा एनसीबीच्या कारवाईतील सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर दोघांचे खरे रूप सर्वांसमोर आले. या दोघांसह १० जण साक्षीदार असल्याचे जाहीर केले. मात्र गोसावी हा सराईत गुन्हेगार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्याच्यावर फसवणूक करून लाखो रुपये घेणे, धमकी देण्यासारखे ३ गुन्हे दाखल आहेत. काही गुन्ह्यांमध्ये त्याला अटक झाली आहे. तर एकामध्ये तो अद्यापही फरार असल्याचे रेकॉर्डवर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यात राहात असलेल्या गोसावीविरुद्ध पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात २९ मे २०१८ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्याने फेसबुकवरून मलेशियात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील तरुणाची तीन लाखाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्याला फरार घोषित करण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी सांगितले. गोसावीवर ठाण्यातील कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये २०१५ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. नोकरीचे आमिष दाखवून फसवल्या प्रकरणी अटक झाली असून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. अन्य एक गुन्हा मुंबईच्या अंधेरी पोलीस ठाण्यात दाखल आहे. ३ जानेवारी २००७ रोजी व्यंकटेशम शिवा वायरवेलने विनोद मकवाना याच्या समवेत क्रेडिट कार्डची डिलिव्हरी न देता त्यांच्या क्रेडिट कार्डने १७,५०० रुपयांची शॉपिंग केली. या प्रकरणात दोघांनीही मे २००७ मध्येच पोलिसांनी अटक झाली होती. न्यायालयात मात्र सबळ पुराव्याच्या अभावी त्याच्यासह इतरांची सुटका झाली आहे.
डिटेक्टिव्ह असल्याची केली बतावणीगळ्यात सोन्याची मोठी साखळी, सोबत खासगी सुरक्षारक्षक घेऊन फिरणारा किरण गोसावी हा खासगी डिटेक्टिव्ह असल्याचे सांगतो. त्याच्या कारवर पोलिसाची प्लेट लावलेली असते. त्यामुळे क्रूझवरील एक पोलीस अधिकारी सापडला असल्याची चर्चा रंगली होती.