अमरावती : राष्ट्रिय कबड्डी स्पर्धेमध्ये खेळविण्याची बतावणी करून मुंबईच्या २५ वर्षीय खेळाडूची सुमारे १ लाख ७० हजार रुपयांनी आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी विदर्भ कबड्डी असोशिएशनचे सेक्रेटरी जितेंद्रसिंग प्राणसिंग ठाकूर व भुपेंद्रसिंग प्राणसिंग ठाकूर (दोघेही रा. पन्नालाल बगिचा, अमरावती) यांच्याविरूध्द शहर कोतवाली पोलिसांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल केले.
मुंबई येथील स्वागत शिंदे (२५) याने याबाबत २८ डिसेंबर २०२२ रोजी तक्रार नोंदविली होती. मात्र, त्याची फारशी दखल घेण्यात आली नाही. मात्र पुढे शिंदे याच्या वडिलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नागपुरचे माजी आमदार गिरिश व्यास यांच्याकडे तक्रार नोंदविली. त्यामुळे त्यांच्या तक्रारीची प्राथमिक चौकशी राजापेठ पोलिसांकडून करण्यात आली. दरम्यान भुपी ठाकरच्या ज्या बॅंक खात्यात ती रक्कम आली, ते खाते, ती बॅंक शहर कोतवालीच्या हद्दीत येत असल्याने गुन्हा दाखल करण्यासाठी ते प्रकरण कोतवालीत हस्तांतरित करण्यात आले. कोतवालीने १८ मार्च रोजी दुपारी ठाकुर बंधुंविरूध्द गुन्हा दाखल केला.
अशी झाली ओळखस्वागत हा चिंचपोकळीयेथे जानेवारी २०२१ मध्ये सराव करत असताना त्याच्या कोचने त्याची ओळख ठाकूर बंधुंशी करून दिली. त्यानंतर काही दिवसांनी विदर्भाच्या संघात निवड करून तुला नॅशनलला पाठवितो, असे भुपी ठाकूरने स्वागतला फोनद्वारे कळविले. दरम्यान तो विदर्भाचा रहिवाशी नसल्याने विदर्भाच्या संघात निवड होण्यासाठी दोन लाख रुपये लागतील, असे त्याच्या वडिलांना सांगण्यात आले. १७ मार्च २०२१ रोजी स्वागतच्या वडिलांनी भुपी ठाकूरच्या खात्यात दीड लाख रुपये नेफ्टद्वारे वळती केले. मात्र निवड समिती तेवढया रकमेत मानत नसल्याचे कारण सांगून पुन्हा २० हजारांची मागणी करण्यात आली.
अयोध्देहून न खेळता परतला -१.७० लाख रुपये मिळाल्यानंतर तुझी अयोध्दा येथे होणाऱ्या राष्ट्रिय स्पर्धेत निवड झाल्याचे सांगून स्वागतला एप्रिल २०२१ मध्ये अमरावतीला बोलावून घेण्यात आले. ११ एप्रिल २०२१ रोजी अन्य १२ खेळाडूंसोबत त्याला अयोध्देला पाठविण्यात आले. मात्र स्वागतची तेथे नोंदणीच झाली नाही. त्यामुळे त्याने रक्कम परत मागितली. मात्र दोन्ही आरोपींनी तुला दुसऱ्या संघातून, प्रो कबड्डी लिगमधून खेळविण्याची टोलवाटोलवी केली. याबाबत अखेर डीसीएमकडे तक्रार केल्यानंतर राजापेठ पोलिसांनी चाैकशीला वेग दिला.