मुंबई - सुपरस्टार शाहरूख खान, दिग्दर्शक महेश भट्ट, निर्माता करीम मोरानी यासारख्या बॉलिवूडमधील अनेक बड्या हस्तींना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देत दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंड रवी पुजारीच साथीदार ओबेद रोडीओवाला (४६) याचा अखेर ताबा मुंबई गुन्हे शाखेला मिळाला आहे. बेकायदेशीर रित्या अमेरिकेत राहणाऱ्या ओबेद रेडिओवाला याला अमेरिकेने अटक केल्यानंतर त्याचा ताबा सीबीआयला देण्यात आला होता. बुधवारी सीबीआयने त्याचा ताबा मुंबई गुन्हे शाखेला दिला असून ओबेद याला मुंबईत आणण्यात आले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्याला आज मोक्का न्यायालयात हजर करण्यात आलं असून उद्यापर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
रवी पुजारी या गँगस्टरचा हस्तक असलेल्या ओबेद याने २०१४ साली दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावर गोळीबार केला होता. त्याचबरोबर निर्माता करीम मोरानीच्या बंगल्यावर गोळीबार करून बॉलिवूडमध्ये दहशद निर्माण केली होती. या प्रकरणी त्याच्याविरोधात मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. चित्रपटाच्या परदेशातील वितरणाचे हक्क मिळवण्याबरोबरच अनेक बॉलिवूडमधील हस्तींकडे खंडणी मागणाऱ्या ओबेद रेडिओवाला याने स्वतःचे आडनाव मर्चंट ठेवून बनावट पासपोर्टच्या मदतीने तो अमेरिकेला गेला. मात्र बनावट पासपोर्टप्रकरणी अमेरिकेत त्याला अटक असून नुकतेच त्याला तेथून हद्दपार करण्यात आले होते. अशा वेळी याची माहिती मुंबई पोलीस आणि सीबीआयला समजताच त्यांनी ओबेद याच्या प्रत्यार्पणाची तयारी सुरू केली होती. अखेर त्याचा ताबा सीबीआयला मिळताच त्याला दिल्लीला आणण्यात आले होते. दरम्यान, ओबेद रोडिओवालावर मुंबईतही अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. त्या गुन्ह्यात पोलिसांनी रोडिओवालाचा ताबा मागितला होता. त्यासाठी लागणाऱ्या परवानग्याही घेत रोडिओवालाचा ताबा घेण्यासाठी मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस दिल्लीला गेले. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट आणि निर्माते करीम मोरानी यांच्या घरावर केलेल्या गोळीबाराप्रकरणी तो पोलिसांना पाहिजे होता. अनिस आणि एसरात हे ओबेद याचे भाऊ असून त्यांचा देखील गोळीबार प्रकरणात हात होता. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अनिस याच्यासह १० जणांना अटक केली होती.