'सेक्स टुरिझम' रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; दोघांची सुटका तर दोनजण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 02:46 PM2021-10-20T14:46:20+5:302021-10-20T14:47:52+5:30
Sex Tourism Racket :आरोपीने गोव्याची ट्रिप आयोजित करत सोबत दोन मुलींना सोबत पाठवण्याची तयारी दाखवली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुंबईत ‘सेक्स टुरिझम रॅकेट'चा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईपोलिसांच्या गुन्हे शाखेने या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुंबई पोलिसांमुळे देहव्यापार करणे कठीण जात असल्याने तरुणींना गोव्याला नेण्यात येत होते. येथून रवाना होण्याआधीच दोन महिला दलालांना गुन्हे शाखेच्या पथकाने विमानतळाजवळ अटक केली आहे. या दोघींच्या तावडीतून देहव्यापारासाठी नेण्यात येणाऱ्या दोन तरुणींची सुटका करण्यात आली. अटक दोन महिला दलालांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
एक महिला आपल्या सहकाऱ्यासोबत मिळून सेक्स टुरिझम चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला होता. संबंधित आरोपी महिलेला याआधीही अटक करण्यात आली होती. पोलिसांनी ग्राहक असल्याचा बनाव करत सापळा रचला होता. यानंतर आरोपीने गोव्याची ट्रिप आयोजित करत सोबत दोन मुलींना सोबत पाठवण्याची तयारी दाखवली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
यानंतर पोलिसांनी विमानतळावरच सापळा रचत अटकेची तयारी केली होती. तीन तरुणी ग्राहकाच्या वेषात असणाऱ्या पोलिसांना भेटल्या त्यावेळी कारवाई कऱण्यात आली. यावेळी पैसे आणि विमान तिकीटाची देवाण घेवाण करण्यात आली. सिग्नल मिळताच तरुणींना ताब्यात घेण्यात आलं. चौकशी केली असता पोलिसांना मुख्या आरोपीची माहिती मिळाली. मुख्य आरोपी असणाऱ्या महिलेने डिपार्चर गेटमधून प्रवेश करत बोर्डिंग पास घेतला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.