मुंब्य्रातील बेपत्ता मुलीचा फेसबुकमुळे लागला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 05:54 AM2019-02-26T05:54:00+5:302019-02-26T05:54:05+5:30

तीन वर्षांपूर्वी केले होते घरातून पलायन : कौटुंबिक कलहामुळे घेतला निर्णय, अपहरण नसून स्वत: घरातून गेल्याचे केले मान्य

Mumbra's missing girl became a Facebook friend | मुंब्य्रातील बेपत्ता मुलीचा फेसबुकमुळे लागला शोध

मुंब्य्रातील बेपत्ता मुलीचा फेसबुकमुळे लागला शोध

Next

ठाणे : गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाला यश आले. तिला शोधण्यासाठी मोबाइलवरील एक अ‍ॅप आणि फेसबुकच्या आधार घेतला गेला. आपले कोणीही अपहरण केले नव्हते. कौटुंबिक कलहामुळे घरातून निघून गेल्याची कबुली तिने पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.


मुंब्रा येथील एका ४० वर्षीय महिलेच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार ५ नोव्हेंबर २०१६ रोजी दाखल झाली होती. याप्रकरणी ७ जानेवारी २०१७ रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. या मुलीचा शोध लागत नसल्याने हे प्रकरण अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग झाले होते. याच मुलीची मोठी बहीण आणि तिच्या पतीने १० दिवसांपूर्वी टिकटॉक या अ‍ॅपवर भोजपुरी गाण्याचा एकत्रित व्हिडीओ अपलोड केला होता. तो पाहून या मुलीने मेहुण्याचा मोबाइल क्रमांक मिळवला. त्याच्याशी तिने मेसेंजरमार्फत चॅटिंग केले. त्याचवेळी तिने घरातील इतरांचीही माहिती घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब त्या मुलीच्या मेहुण्याने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा, ती अभय शेट्टी या बनावट नावाच्या फेसबुक अकाउंटवरून त्याच्याशी चॅटिंग करत असल्याचे उघड झाले. त्याचवेळी पोलिसांनी शक्कल लढवून मेहुण्याची सासू अर्थात तिची आई आजारी असल्याचा तिला मेसेज पाठवला. हा मेसेज पाहिल्यानंतर तिने व्हिडीओ कॉल केला.

त्याचवेळी ती अभय शेट्टी नसून बेपत्ता असलेली अल्पवयीन मुलगी असल्याचे तिनेच मान्य केले. तिने भेटायला येण्याचेही मान्य केले. ती २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता तिच्या चरईतील बहिणीला भेटण्यासाठी आली, तेव्हा पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. आता कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

गुजरातमध्ये करायची काम
घरातून कौटुंबिक कलहामुळे निघून गेल्यानंतर गोरेगाव येथे वास्तव्याला होती. त्यानंतर, ती कॅटरिंगच्या कामासाठी सुरत (गुजरात) येथे गेली. गुजरात येथून वसईमध्ये आठ ते नऊ महिने राहिली. सध्या ती नालासोपारा येथे राहत होती. तेथेही कॅटरिंगची विविध कामे ती करत असे.

Web Title: Mumbra's missing girl became a Facebook friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.