मीरारोड - महापालिकेच्या मीरारोडचे प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे यांच्यावर राजकारण्यांचे आचार संहिता भंग करणारे बेकायदेशीर जाहिरात फलकांना संरक्षण दिल्याने निलंबित करण्याच्या तक्रारी थेट निवडणुक आयोगापर्यंत झाल्याने अखेर गुरुवारी रात्री मीरारोड भागातील ६० पेक्षा जास्त बेकायदा फलक काढून नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली गेली. भाजपासह काँग्रेस, आम आदमी पक्षाच्या फलकांवर कारवाई केली गेली.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असताना देखील मीरारोडच्या शांती नगर भागातील महापालिकेच्या ताब्यातील मैदानांमध्ये सर्रास बेकायदेशीर राजकीय प्रचारांचे फलक लावण्यात आले होते. धार्मिक उत्सव तसेच महापालिकेच्या ताब्यातील मैदान असुन देखील कोणतीच परवानगी न घेता मोठ्या संख्येने सत्ताधारी भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता, नगरसेवक - पदाधिकारी यांचे जाहिरात फलक, कमान लावण्यात आले होते.परंतु प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे मात्र नवरात्रीला ५ दिवस उलटले तरी या पालिका ताब्यातील मैदानांमध्ये लागलेल्या बेकायदेशीर फलकांवर कारवाई करण्यास टाळटाळ करत होते. या प्रकरणी अनेक तक्रारदारांनी थेट निवडणुक आयोगापर्यंत याच्या तक्रारी करुन गोडसे यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली होती. महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर आणि पालिका अधिकारी हे स्थानिक सत्ताधारी भाजपाच्या राजकिय व आर्थिक फायद्यासाठी सातत्याने काम करत असल्याने ते आचार संहितेचे काटेकोर पालन करणार नाहीत अशा असंख्य तक्रारी नागरीकांनी आयोगासह शासनाकडे चालवल्या होत्या.मैदानांमधील मोठ्या संख्येने लागलेल्या बेकयदेशीर जाहिरात फलकांप्रकरणी अडचणीत आल्यानंतर अखेर गोडसे यांनी गुरुवारी रात्री ८ वा. आपल्या पथकासह मीरारोड भागातील बेकायदा फलकांवर कारवाई सुरु केली. मीरारोड रेल्वे स्थानकासमोरील शांती शॉपींग सेंटरच्या आवारात आम आदमी पार्टीचे उमेदवार नरेंद्र भंबवानी यांचे छायाचित्र असलेले प्रचारांचे लहान २३ बॅनर पालिकेची परवानगी नसल्याने ते काढण्यात आले. नया नगर, शांती नगर परिसरात काँग्रेस आघाडीचे उमेदवार मुझफ्फर हुसेन यांचे छायाचित्र असलेले प्रचाराचे २१ ठिकाणी असलेले जाहिरात फलक गोडसे व पथकाने काढले. तर शांती नगर सेक्टर ३ च्या मैदानात भाजपा नगरसेवक दिनेश जैन यांनी आयोजित केलेल्या नवरात्री उत्सवात भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता, भाजपाचे नगरसेवक व पदाधिकारायांचे लहान मोठे १८ जाहिरात फलक लावण्यात आले होते. ते काढून टाकण्यात आले. या प्रकरणी जाहिरात फलक लावणाराया अनोळखीं विरोधात लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, महाराट्र मालमत्ता विरुपण प्रतिबंधक अधिनियम व भादंसंच्या कलमांतर्गत अनोळखी व्यक्तीं विरोधात नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु अन्य काही भागातील बेकायदा फलकांवर मात्र कारवाई आणि गुन्हा दाखल केला गेला नसल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे.परंतु कारवाई आधी गोडसे यांनी मात्र १४५ - मीरा भाईंदर मतदार संघाच्या निवडणुक निर्णय अधिकारी यांनीच फलकांना परवानगी दिली असल्याचे सांगत त्यांनी परवानगी रदद्द केली तर कारवाई करु असा पावित्रा घेतला होता. परंतु सहाय्यक निर्णय अधिकारी मुकेश पाटील यांनी मात्र, या कार्यालयातुन केवळ नाहरकत पत्र दिले असून त्यामध्ये महापालिका आदी संबंधितांच्या परवानग्या घेणे आवश्यक असल्याचे नमूद असल्याचे स्पष्ट करत गोडसे यांचा खोटेपणा उघड केला. आयुक्त खतगावकर यांनी अखेर गोडसेंना कारवाईचे आदेश दिल्यावर त्यांनी कारवाई केल्याचे सुत्रांनी सांगितले.
बेकायदेशीर जाहिरात फलकांच्या वाढत्या तक्रारीनंतर पालिकेने उचलला कारवाईचा बडगा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 9:50 PM
भाजपासह काँग्रेस, आम आदमी पक्षाच्या फलकांवर कारवाई केली गेली.
ठळक मुद्देमीरारोड भागातील ६० पेक्षा जास्त बेकायदा फलक काढून नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली गेली. आयुक्त खतगावकर यांनी अखेर गोडसेंना कारवाईचे आदेश दिल्यावर त्यांनी कारवाई केल्याचे सुत्रांनी सांगितले.