पानटपरीवरील उधारीच्या पैश्यावरून खून; कोयता आणि पाईपने केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 10:21 AM2020-11-13T10:21:47+5:302020-11-13T10:23:26+5:30
Pune Crime News : पानटपरीवरील उधारीच्या पैश्यावरुन झालेल्या भांडणातून कोयत्याने तसेच पाईपने मारहाण करून एकाचा खून करण्यात आला आहे. ही घटना पुण्यातील नांदेड फाटा परिसरात गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.
पुणे/धायरी - पानटपरीवरील उधारीच्या पैश्यावरुन झालेल्या भांडणातून कोयत्याने तसेच पाईपने मारहाण करून एकाचा खून करण्यात आला आहे. ही घटना पुण्यातील नांदेड फाटा परिसरात गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. अजय शिवाजी शिंदे (वय :२३, रा. गोसावी वस्ती, नांदेड, तालुका :हवेली, जिल्हा: पुणे) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत मयत तरुणाचा मावसभाऊ राकेश तुळशीराम जाधव(वय: २४, रा. जाधव नगर, गोसावी वस्ती, नांदेड, ता. हवेली, जिल्हा पुणे) यांनी हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ॉ
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत अजय शिंदे व आरोपी राहुल सपकाळ यांच्यात पूर्वीपासून वाद होता. आरोपीची त्या भागात पूर्वी पानटपरी होती. गुरुवारी रात्री नांदेड परिसरातील कीर्ती बारसमोर राहुल सपकाळ व अजय शिंदे यांच्यात पानटपरीच्या उधारीवरून बाचाबाची झाली. यावेळी त्यांच्यातील वाद टोकाला गेल्याने आरोपी राहुल सपकाळ व इतर सहा जणांनी मिळून अजयच्या डोक्यावर, गळ्यावर, छातीवर कोयत्याने वार करून विटाने तसेच पाइपने मारहाण केली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. दरम्यान जखमी अवस्थेत असणाऱ्या अजयला रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी हवेली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, पोलीस हवालदार संजय शेंडगे, पोलीस नाईक दिनेश कोळेकर, पोलीस कॉन्स्टेबल संतोष भापकर, राजेंद्र मुंढे, महेंद्र चौधरी, पोलीस मित्र सुदीप पोळ हे दाखल झाले होते. याबाबत हवेली पोलिस ठाण्यात राहुल सपकाळ, रोहित सपकाळ, दुर्वेश उर्फ दुर्ग्या, सुधीर उर्फ सुध्या, पृथ्वी उर्फ चिराग ( सर्व रा. नांदेड गाव, ता. हवेली, जिल्हा पुणे) व त्यांचे अन्य तीन साथीदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार असणाऱ्या आरोपींच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. हवेली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार पुढील तपास करीत आहेत.
महिन्यातील दुसरी घटना
१८ ऑक्टोबर रोजी नांदेड फाटा परिसरात यश कांबळे या तरुणाचा खून करण्यात आला होता. ह्या नांदेड फाटा परिसरातील ही दुसरी घटना असल्याने येथील नागरिकांत व व्यावसायिकात घबराटीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई करून वेळीच जरब बसविणे गरजेचे असल्याचे मत काही नागरिकांनी व्यक्त केले.