बंगळुरू : कनिष्ठ जातीतील तरुणाशी प्रेमसंबंध ठेवल्यामुळे एका १९ वर्षीय तरुणीची तिचा पिता आणि दोन चुलत भावांनी हत्या केल्याची घटना कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यात घडली आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. हत्या करून मृतदेह पुरून टाकल्यानंतर मुलीच्या पित्याने मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
रामनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मगाडी तालुक्यातील बेट्टडहळ्ळी गावात ही घटना घडली. हेमलता (१९) असे मृत मुलीचे नाव आहे. ती वोकलिंगा या उच्च जातीची असून तिचे अनुसूचित जातीतील पुनीत नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्यावरून तिची हत्या करण्यात आली. मुलगी बी.कॉम.ची विद्यार्थिनी होती.
रामनगरचे एसपी गिरीश यांनी सांगितले की, तपासासाठी आम्ही २१ पथके स्थापन केली होती. १० आॅक्टोबर रोजी हेमलताचा मृतदेह सापडला. कुटुंबियांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले; पण तिच्या आई-वडिलांना दु:ख झाल्याचे दिसून येत नव्हते. तिच्या पित्याने २४ तासांनंतर बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. हा आॅनर किलिंगचा प्रकार असल्याचे आमच्या तपासात आढळून आले.मुलगी बेपत्ता झाल्याची दिली तक्रारमुलीचा पिता कृष्णाप्पा याने ९ आॅक्टोबर रोजी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलीचा मृतदेह कृष्णाप्पाच्या भावाच्या शेतात सापडला. पोलीस महासंचालक सीमंतकुमारसिंग यांनी सांगितले की, आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी नियोजनबद्ध योजना आखली होती. ८ आॅक्टोबर रोजी मुलीची हत्या करून मृतदेह शेतात पुरण्यात आला. त्यानंतर मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली.