विवाहितेची हत्या करून मृतदेह जाळला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 12:21 PM2020-06-08T12:21:47+5:302020-06-08T12:21:55+5:30
पैशाची मागणी करून विवाहितेची हत्या करीत तिचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला
लोकमत न्युज नेटवर्क
आसेगाव (वाशिम): पैशाची मागणी करून विवाहितेची हत्या करीत तिचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. ही घटना मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया नांदगाव शिवारात ७ जून रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. लक्ष्मी उर्फ कामिनी प्रमोद भोयर, असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी आसेगाव पोलिसांनी मृतक महिलेचा पती प्रमोद तुळशीराम भोयर, तुळशीराम कोयाजी भोयर दोन्ही रा. आसेगाव, तसेच गजानन बंडू भोयर रा. चिंचोली ता. मंगरुळपीर यांच्याविरोधात कलम ३०२, २०१, ३४ नुसार गुन्हा दाखल केला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतक महिलेची मावशी शांताबाई विठ्ठल खडसे (४९, रा. देवठाणा. ता., जि. वाशिम) यांनी आसेगाव पोलिसांत ७ जून रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले आहे की, मृतक लक्ष्मी उर्फ कामिनी हिच्याशी तिचा पती प्रमोद भोयर हा तिच्या नावावर जमा असलेले ५ लाख रुपये घेण्यासाठी भांडण करून तिला त्रास देत होता, तसेच तिला त्रास देत होता. तिने पैसे न दिल्यामुळे प्रमोद भोयरसह इतर आरोपींनी संगनमत करून तिला ठार करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या फिर्यादीवरून आसेगाव पोलिसांनी पती प्रमोद तुळशीराम भोयर, तुळशीराम कोयाजी भोयर दोन्ही रा. आसेगाव, तसेच गजानन बंडू भोयर रा. चिंचोली या तिघांविरोधात कलम ३०२, २०१, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आसेगावचे ठाणेदार शिवाजी लष्करे यांच्या मार्गदर्शनात अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर खंडार करीत आहेत.