टिटवाळा :कर्ज मंजूर करून देण्यासाठी दोन लाख ६० हजार रुपये घेऊनही काम न केल्याने शैलेश भगत (५५, रा. सोष्टे ब्रदर्स चाळ, गणेशवाडी) यांना शनिवारी लतीफ पठाण (६०), वसीम तडवी, इम्रान तडवी व गुरु विंदर सोधी यांनी बेदम मारहाण केली. रक्तस्राव झाल्याने भगत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. खूनप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे.
कर्ज मंजूर करून देण्यासाठी महिनाभरापूर्वी भगत यांना पठाण याने दोन लाख ६० हजार रुपये दिले होते. मात्र, भगत यांनी ते काम केले नाही. त्यामुळे पठाण याने भगत यांच्याकडे पैसे परत दे, असा तगादा लावला होता. भगत यांनी पैसेही न दिल्याने पठाण हा मित्र वसीम तडवी, इम्रान तडवी व गुरु विंदर सोधी यांच्यासह क्रिकेटचा स्टम्प घेऊन शनिवारी सकाळी भगत यांच्या घरी आला. तेथे भगत यांना शिवीगाळ व दमदाटी करत त्यांना स्टम्पने मारहाण केली. त्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे पाहून चौघेही तेथून पळून गेले.जखमी भगत यांना अगोदर गोवेली, उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालय व नंतर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, जास्त रक्तस्राव झाल्याने येथील डॉक्टरांनी भगत यांना मृत घोषित केले.
भगत यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून टिटवाळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवला. पोलिसांनी तपास करून चौघाही आरोपींना काही तासांतच डोंबिवलीतून अटक केली.
पठाण हा निवृत्त फौजदारया घटनेतील मुख्य आरोपी लतीफ पठाण हा पोलीस दलातील निवृत्त सहायक फौजदार आहे. तो एका महिन्यापूर्वी पोलीस दलातून निवृत्त झाला होता, असे सूत्रांनी सांगितले.