पिंपरी : मित्राच्या आईसोबत गाडीवरून जात असताना तरुणावर सहा जणांनी सपासप वार केले. त्यामध्ये तरुणाच्या शरीरातून गंभीर इजा झाली आहे. ही घटना सोमवारी (दि. १५) रात्री सव्वा बाराच्या सुमारास थेरगाव येथील धनगरबाबा मंदिराजवळ घडली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाबासाहेब महादेव वडमारे (वय ३०, रा. कैैलासनगर, थेरगाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. अनिकेत रुपसिंग भाट (वय २१), राहुल ऊर्फ सुधीर सहदेव झेंडे (वय २२), मेहबूब दस्तगीर पटेल (वय २२) युवराज अशोक शिंदे (सर्व रा. थेरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर स्वप्नील सगर व रुतिक ऊर्फ वृषभ रमेश मिश्रा (दोघे रा. थेरगाव) फरार आहेत. याप्रकरणी विशाखा महादेव वडमारे (वय २८) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब सोमवारी (दि. १५) रात्री सव्वा बाराच्या सुमारास मित्राची आई अनिता भाट (वय ४५) यांना दुचाकीवर घेऊन येत होता. दरम्यान, थेरगाव येथील धनगरबाबा मंदिराजवळ सहा जणांनी त्याच्यावर सशस्त्र हल्ला चढवला. यामध्ये बाबासाहेब आणि अनिता दोघेही गंभीर जखमी झाले. नागरिकांनी दोघांना काळेवाडी फाटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. बाबासाहेब याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला चिंचवड येथील एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. नातेवाइकांना हल्ल्याबाबत काहीच माहिती नसल्याने डॉक्टरांनी वाकड पोलिसांना अपघाताची खबर दिली. त्यानुसार वाकड पोलिसांनी बाबासाहेब यांचा अपघात झाल्याची नोंद केली. काही दिवस उपचार घेतल्यानंतर बाबासाहेब काही वेळेसाठी शुद्धीवर आले. त्या वेळी त्याने बहीण विशाखा हिला आपल्यावर हल्ला झाला असल्याचे सांगितले. मात्र विशाखाला माहिती देत असतानाच बाबासाहेब पुन्हा बेशुद्ध झाले. त्यानंतर विशाखाला अनिता यांच्यावरही हल्ला झाल्याचे समजले, तिने याबाबत माहिती घेतली असता हल्ला झाला असल्याचे समजले. तिने तत्काळ वाकड पोलिसांना माहिती देत फिर्याद नोंदवली. वाकड पोलिसांनी तपास करत या प्रकरणातील चार जणांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता, आरोपी अनिकेत भाट आणि फिर्यादी विशाखा यांचे मागील सहा महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. त्या रागातून अनिकेत याच्या सांगण्यावरून त्याचासह पाच जणांनी मिळून विशाखा यांचा भाऊ बाबासाहेब यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. यामध्ये त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाकड पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
वाकडमध्ये पूर्ववैैमनस्यातून एकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 5:10 PM