चाकण येथे मार्केटमध्ये झोपू न दिल्याने तरुणाने केला खून; ८ तासांत आरोपीला केले अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 03:34 PM2020-10-06T15:34:51+5:302020-10-06T15:35:48+5:30
मार्केटमध्ये झोपू नको, असे म्हणाल्याचा राग मनात ठेवून तरुणाने केला हा खून
पिंपरी : चाकण येथे पुणे-नाशिक महामार्गालगत शनिवारी (दि. ३) एकाचा निर्घूण खून झाला. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या युनिट तीनच्या पथकाने एका तरुणाला अटक केली आहे. मार्केटमध्ये झोपू नको, असे म्हणाल्याचा राग मनात ठेवून तरुणाने हा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
मनोज हरिप्रसाद कुमरे (वय २६, रा. चाकण, मूळगाव सुखापुरापट्टी, हर्रई, ता. अमलवाडा, जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रामदास राजाराम घुंबरे (वय ४८, रा. चाकण, मूळ रा. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथे पुणे - नाशिक महामार्गाच्या बाजूला भाजी मार्केटच्या पत्राशेडमध्ये रामदास घुंबरे यांच्या डोक्यात दगड घालून खून झाल्याचा प्रकार शनिवारी समोर आला. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने युनिट तीनच्या पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. त्यासाठी दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. आरोपी मनोज कुमरे हा चाकण येथील तळेगाव चौकात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. रामदास घुंबरे व मार्केटमधील गाळयांचे गॅनेजर यांनी मार्केटमध्ये थांबायचे नाही व झोपायचे नाही असे बोलून मारहाण करून शिवीगाळ केली होती. तसेच रामदास घुंबरे यांनी शुक्रवारी (दि. २) रात्री साडेदहाच्या सुमारास मार्केटमध्ये झोपू नको म्हणून शिवीगाळ केली होती. त्यानंतर घुंबरे हे मार्केटमध्ये झोपले. मात्र त्यांनी शिवीगाळ केल्याचा राग मनात ठेवून रात्री साडेबाराच्या सुमारास घुंबरे हे झोपले असताना त्यांच्या डोक्यात दगड मारून आरोपी मनोज कुमरे याने त्यांचा खून केल्याची कबुली दिली आहे. आरोपी याला चाकण पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.
युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर, सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस कर्मचारी हजरत पठाण, यदु आढारी, नाथा केकाण, सचिन मोरे, विठठल सानप, गंगाधर चव्हाण, योगेश्वर कोळेकर, महेश भालचिम, राजकुमार हनमते, सागर जैनक, त्रिनयन बाळराराफ, प्रवीण पाटील, राहुल सूर्यवंशी, प्रमोद ढाकणे व गजानन आगलावे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.