नवी मुंबई - घणसोलीत आढळून आलेल्या धड व शिराचे गूढ अद्यापही पोलिसांपुढे कायम आहे. हे दोन्ही अवयव एकाच महिलेचे असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, त्या संबंधीचा डीएनए अहवाल पोलिसांना मिळालेला नसून त्यानंतरच पोलिसांना तपासाची दिशा मिळणार आहे.
नवी मुंबईत खळबळ उडवणारी घटना पाच महिन्यांपूर्वी घणसोलीत घडली होती. तिथल्या पाम बीच मार्गालगतच्या मोकळ्या भूखंडावरील झाडीमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत महिलेचे शिर आढळून आले होते. २६ मार्चच्या या घटनेनंतर तीन महिन्यांनी ३ जूनला त्या घटनास्थळापासून काही अंतरावरील वापरात नसलेल्या उंच पाण्याच्या टाकीत शिर नसलेले धड आढळले. या दोन्ही घटनांनी घणसोली परिसरात नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. या हत्येचा उलगडा करण्यासाठी रबाळे पोलिसांनी सर्वोतोपरी प्रयत्न करूनही हाती काहीच लागले नाही. त्याकरिता दोन्ही घटनास्थळांचा संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात आला. मात्र, दोन्ही अवयव अनेक दिवसांपूर्वी त्या ठिकाणी टाकण्यात आलेले असल्याने कसलाही ठोस पुरावा पोलिसांना आढळला नाही. अखेर ते शिर व धड एकाच महिलेचे आहे का? याचा उलगडा करण्यासाठी त्याची डीएनए चाचणी केली. मात्र, त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. यामुळे अद्यापपर्यंत पोलिसांना तपासाची योग्य दिशा मिळालेली नाही.या महिलेची हत्या केल्यानंतर तिचे शिर धडावेगळे करून ते मोकळ्या भूखंडावरील झाडीत जाळण्याचा प्रयत्न झाला असावा, असाही अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, त्या मृत महिलेची ओळख पटेल, असा कसलाही पुरावा पोलिसांना मिळालेला नाही. त्याकरिता नवी मुंबईसह लगतच्या शहरातून बेपत्ता असलेल्या महिलांचीही माहिती मिळवण्यात आली; परंतु त्यातूनही काहीच हाती न लागल्याने पोलिसांपुढे तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.
या पूर्वीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात यश
च्यापूर्वीही नवी मुंबईत पाम बीच मार्गावर, बोनकोडे येथील नाल्यालगत तसेच तुर्भे एमआयडीसी परिसरात मृतदेह आढळल्याचे प्रकार घडले आहेत. शहराबाहेर हत्या केल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ते नवी मुंबईत टाकले जात होते.
त्यापैकी बहुतांश गुन्ह्यांची उकल पोलिसांनी अत्यंत कौशल्याने केली आहे; परंतु घणसोली येथे आढळलेल्या अज्ञात महिलेचे धड व शिर यावरून तिच्या हत्येचा उलगडा करण्याचे पोलिसांचे कौशल्य पणाला लागले आहे.