गडचिरोली : गेल्या १५ वर्षांपासून महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात नक्षली कारवाया आणि चळवळीच्या विस्तारात सक्रीय असलेला नक्षलींचा डिव्हीजन कमांडर पहाडसिंग याने छत्तीसगडमधील भिलाई पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्याचे हे आत्मसमर्पण नक्षल चळवळीला मोठा धक्का मानले जात आहे. त्याच्यावर महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश राज्यांनी मिळून ४७ लाखांचे इनाम घोषित केले होते.
नक्षल चळवळीत पहाडसिंग उर्फ अशोक उर्फ टिपू सुलतान उर्फ बाबूराव तोफा अशा वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पहाडसिंगचे खरे नाव कुमारसाय कतलामी असे आहे. २००३ मध्ये तो नक्षल चळवळीत दाखल झाला होता. २०१५ पर्यंत उत्तर गडचिरोली व गोंदिया विभागाचा कमांडर असलेल्या पहाडसिंगवर नंतर महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड (एमएमसी) या नवीन झोनची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यात गोंदिया, बालाघाट आणि राजनांदगाव या तीन राज्यांच्या सीमावर्ती जिल्ह्यांचा समावेश आहे. या झोनची जबाबदारी आल्यापासून तो बालाघाट परिसरात नक्षल चळवळीचा विस्तार करण्याचे काम करीत होता.
तत्पूर्वी त्याने उत्तर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातही अनेक हिंसक कारवायांनी हादरवून सोडले होते. त्याच्यावर महाराष्ट्र ५१ गुन्हे तर छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याची माहिती देणाऱ्यास तीनही राज्यांनी लाखो रुपयांचे बक्षिस ठेवले होते. पहाडसिंगवर बालाघाट, गोंदिया व राजनांदगाव जिल्ह्यात नक्षल चळवळ विस्ताराची जबाबदारी होती. मात्र अलिकडे त्यात त्याला यश येत नव्हते. त्यामुळे नक्षल चळवळीकडून त्याच्यावर दबाव वाढत होता. याला कंटाळून त्याने आत्मसमर्पण केल्याचे छत्तीसगडमधील दुर्गचे पोलीस महानिरीक्षक जी.पी.सिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पहाडसिंग असा नक्षल चळवळीकडे वळलापहाडसिंग उर्फ कुमारसाय कतलामी याची पत्नी शकुनीबाई 2001 ते 2003 या काळात छत्तीसगडमधील फाफामार गावची सरपंच होती. परंतु गावात विकास कामे करण्यावरून पहाडसिंग, त्याची पत्नी आणि गावकऱ्यांमध्ये वाद झाला. त्यातून शकुनीबाईवर अविश्वास ठराव आणून तो पारितही करण्यात आला. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या पहाडसिंगने नक्षल चळवळीत जाऊन हिंसक कारवाया सुरू केल्या.
२०१३ मध्ये आत्मसमर्पणासाठी प्रयत्नगडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी २०१३ मध्ये पहाडसिंगच्या महाराष्ट्र सीमेवर असलेल्या छत्तीसगड राज्यातील फाफामार या गावात जाऊन त्याचे घर गाठले होते. त्यावेळी हक यांनी पहाडसिंगच्या कुटुंबीयांना कपडे व मिठाई देऊन पहाडसिंगला आत्मसमर्पण करण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहन केले होते. मात्र, पहाडसिंगऐवजी त्याचा अंगरक्षक म्हणून काम करणाऱ्या संदीप नामक नक्षलवाद्याने जून २०१४ मध्ये राजनांदगाव पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात पहाडसिंगला आता जलद हालचाली करता येत नसल्यामुळे तोसुद्धा आत्मसमर्पण करू शकतो असे सांगितले होते. त्यामुळे गडचिरोली पोलिसांनी त्याच्या आत्मसमर्पणासाठी प्रयत्न केले, मात्र त्यात यश आले नाही.