घरासमोर फटाके वाजवू नका, सांगितल्याने शेजाऱ्यांनी एका कुटुंबाला केली बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 02:37 PM2020-11-18T14:37:39+5:302020-11-18T14:38:03+5:30
Crime News : घरातील लहान मुलगा व आजीला त्रस होत आहे असे सांगितले. या कारणावरुन शेजाऱ्यांनी या तरुणासह त्याच्या आई व आजीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
कल्याण - दिवाळीत कोरोनामुळे फटाके वाजवू नका असे सरकारतर्फे आवाहन करण्यात आलेले असता कल्याण शिवाजीनगर परिसरात काही मंडळी जोरात फटाके वाजवित होती. एका तरुणाने घरासमोर जोरात फटाके वाजू नका. घरातील लहान मुलगा व आजीला त्रस होत आहे असे सांगितले. या कारणावरुन शेजाऱ्यांनी या तरुणासह त्याच्या आई व आजीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
शिवाजीनगर येथे राहणारा अभिजीत वाघमारे हा तरुण दिवाळीच्या दिवशी घरी होती. त्याच्या घरात दिवाळीचा आनंद साजरा केला जात होता. भाऊबीजेच्या दिवशी रात्री दहा वाजताच्या सुमारास त्याच्या घराशेजारी राहणा:या तरुणांनी त्याच्या घराजवळ मोठया आवाजाचे फटाके वाजविणो सुरु केले. त्या फटाक्यांच्या ठिणग्या खिडकीतून घरात येत होत्या. फटाक्याच्या आवाजाचा त्रस त्याचा लहान मुलगा व आजीला होत होता. त्याने फटाके वाजवू नका असे शेजारी तरुणांना सांगितले. या गोष्टीचा राग मनात धरुन शेजारी तरुणांनी अभिजीतला माराहाण केली. त्याच्या डाव्या डोळ्य़ाच्या खाली जबर दुखापत झाली आहे. अभिजीतला मारहाण होत असल्याचे पाहून त्याची आई उषा सोडविण्यास गेली असता. तिच्या अंगावरील कपडे ओढून तिलाही मारहाण केली. नातू व मुलगीला मारहाण होत असल्या पाहून आजीबाई पुढे सरसावल्या. तेव्हा त्याच्या आजीलाही जोराचा ठोसा लगाविला गेला. आईच्या नाकातून रक्ताची धार लागली. अभिजीच्या आई उषा या उल्हासनगर महापालिकेतील कर्मचारी आहेत.
वाघमारे यांनी महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपींच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. अभिजीतला झालेल्या मारहाण प्रकरणी वैद्यकीय प्रमाणपत्र येताच पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली आहे. मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणी मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी भूषण पवार व दिनेश सावंत यांनी आरोपींच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे.