काय सांगता! सामान्य मुलीच्या बँक खात्यात तब्बल १० कोटी आले अन् तिनं थेट पोलीस स्टेशन गाठले
By प्रविण मरगळे | Published: September 22, 2020 04:43 PM2020-09-22T16:43:24+5:302020-09-22T16:44:01+5:30
रुकूनपुरा गावातील सरोजचं अलाहाबादच्या बँकेत खाते आहे. तिच्या खात्यात कोणीतरी ९ कोटी ९९ लाख रुपये काहीही न सांगता जमा केले.
बलिया – जर तुम्ही कोणत्या बँकेत गेला अन् तुम्हाला माहिती पडलं तुमच्या खात्यावर १० कोटी रुपये जमा झालेत, तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. बलियात सायबर क्राईमचा असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे एका सामान्य कुटुंबातील एका मुलीच्या खात्यावर कोणीतरी १० कोटी रुपये जमा केले. जेव्हा मुलीला याची माहिती मिळाली तिच्यासमोर संकट उभं राहिले. तिने थेट पोलीस ठाणे गाठलं त्यानंतर तिचं अकाऊंट फ्रिज करण्यात आलं.
माहितीनुसार, रुकूनपुरा गावातील सरोजचं अलाहाबादच्या बँकेत खाते आहे. तिच्या खात्यात कोणीतरी ९ कोटी ९९ लाख रुपये काहीही न सांगता जमा केले. सामान्य कुटुंबातील सरोजच्या खात्यात इतकी मोठी रक्कम जमा झाल्याने तिच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. त्याठिकाणी कुटुंबाने तक्रार दिली, पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अलाहाबाद बँकेत सरोजने २०१८ मध्ये खाते उघडले होते, सोमवारी ती पासबुक अपडेट करण्यासाठी बँकेच्या बांसडीह शाखेत पोहचली. तेव्हा तिला माहिती मिळाली की कोणीतरी तिच्या खात्यात पैसे पाठवले आहेत. ही रक्कम थोडीफार नव्हती तर तब्बल १० कोटी रुपये होती. त्यानंतर सरोजने पोलीस ठाण्यात लिखित तक्रार दिली. या तक्रारीत म्हटलं आहे की, २ वर्षापूर्वी तिला निलेश नावाच्या एका माणसाने फोन केला होता, तेव्हा आधार आणि काही अन्य कागदपत्रे पोस्टाने पाठवण्यास सांगितले होते. त्या बदल्यात पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळेल असं आश्वासन निलेशने सरोजला दिले होते. याच काळात पोस्ट ऑफिसमधून तिला एटीएम मिळाले. जे तिने निलेशकडे पाठवले होते.
बँकेकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या खात्यात अनेकदा पैसे आले आहेत तर सरोजला याबाबत काहीच कल्पना नव्हती. बँकेने तात्काळ सरोजच्या तक्रारीनंतर अकाऊंट फ्रिज करुन त्यातील व्यवहार स्थगित केले. तर सरोजकडे असणारा निलेश कुमारचा मोबाईलही स्विचऑफ आहे. सरोजचं शिक्षण झालं नाही, कसंतरी ती स्वाक्षरी करु शकते. अशातच ती सायबर गुन्हेगारांच्या विळख्यात सापडली. सरोजचे वडील अहमदाबाद येथे गॅरेजमध्ये नोकरी करतात, त्यातून त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करतात. सरोजच्या खात्यावर एवढी मोठी रक्कम आल्याने सगळीकडे हा चर्चेचा विषय बनला आहे. सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत, बांसडीह पोलीस आणि बँक संयुक्तरित्या याचा शोध घेत आहेत. लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल, दोषींना पकडण्यात येईल असं पोलिसांनी सांगितले आहे.