भीमा कोरेगाव प्रकरणात एनआयएने (NIA) आतापर्यंत 16 आरोपींना अटक केली आहे. एनआयएने न्यायालयात आतापर्यंत 21 आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपींपैकी एक म्हणजे वरवरा राव यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे.
फेब्रुवारी २०२० पासून आतापर्यंत राव ३६५ दिवसांपैकी १४९ दिवस रुग्णालयातच होते. यावरून त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे समजते, अशी माहिती एल्गार परिषद प्रकरणी आरोपी असलेले ज्येष्ठ विचारवंत वरवरा राव यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी उच्च न्यायालयाला सोमवारी दिली. दरम्यान न्यायालयाने या जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला.राव यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांची जामिनावर सुटका करावी व त्यांना त्यांच्या कुटुंबियांसमवेत हैद्राबाद येथे राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती जयसिंग यांनी न्या. एस.एस. शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठाला केली. आयुष्य सर्वांनाच प्रिय आहे. कैद्यांनाही ते प्रियच आहे आणि न्यायालय त्याचे संरक्षण करण्यासाठी आहे. वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी राव १४९ दिवस रुग्णालयातच होते. त्यांची प्रकृती चांगली नसल्याचे निदर्शनास आणण्यासाठी हे रेकॉर्ड पुरेसे बोलके आहे, असा युक्तिवाद राव यांच्या वकिलांनी केला होता.