अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी नायजेरियन दोषी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 01:42 PM2018-10-23T13:42:38+5:302018-10-23T13:43:11+5:30
सुमारे साडेचार वर्षांपूर्वी १८ मे २०१४ साली अमली पदार्थ विरोधी विभाग (एएनसीने) चुक्स इगबोला या नायजेरियन नागरिकाला म्हापसाजवळील पर्रा-काणका भागात केलेल्या कारवाईत अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून ०.७ ग्रामचे एलएसडी पेपर्स प्रकारचे अमली पदार्थ ताब्यात घेतले होते.
म्हापसा - अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी म्हापशातील अतिरिक्त सत्र न्यायालयाने नायजेरियन नागरिक चुक्स इगबो याला दोषी ठरवून त्याला चार वर्षे पाच महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिक्षेसोबत त्याला १५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
या प्रकरणातील सुनावणीच्या काळात तो कारागृहात असल्याने शिक्षा भोगण्यापासून कारागृहात आतापर्यंत काढलेला काळ शिक्षेतून वगळण्यात आला आहे. सुमारे साडेचार वर्षांपूर्वी १८ मे २०१४ साली अमली पदार्थ विरोधी विभाग (एएनसीने) चुक्स इगबोला या नायजेरियन नागरिकाला म्हापसाजवळील पर्रा-काणका भागात केलेल्या कारवाईत अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून ०.७ ग्रामचे एलएसडी पेपर्स प्रकारचे अमली पदार्थ ताब्यात घेतले होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत ३ लाख २५ हजार रुपयांची होती. विभागाचे उपनिरीक्षक थॅर्रोन डिकोस्टा यांनी सदरची कारवाई केली होती. केलेल्या कारवाईत त्याच्याकडून १ हजार रुपयांची रोकड तसेच एक दुचाकी सुद्धा ताब्यात घेण्यात आलेली. त्यानंतर संशयितावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यावर झालेल्या सुनावणी अंती त्याला दोषी ठरवण्यात आले.
सरकारी पक्षाच्या बाजूने सरकारी वकिल अॅड. अनुराधा तळावलीकर यांनी तर आरोपीच्यावतीने अॅड टि. जॉर्ज यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्याच्याजवळ सापडलेले अमली पदार्थ परिवर्तीत मात्राने असल्यामुळे त्यानुसार ही शिक्षा देण्यात आली आहे.