नीरव मोदी प्रकरण : ईडीच्या मुंबई प्रमुखांची तडकाफडकी हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 03:03 PM2019-04-17T15:03:59+5:302019-04-17T15:06:18+5:30
१९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या अग्रवाल यांची जानेवारी २०१७ मध्ये ईडीत प्रतिनियुक्ती करण्यात आली होती.
मुंबई - पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदी याच्या आर्थिक घोटाळ्याच्या तपासाची जबाबदारी असलेले अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी ) मुंबई विभागाचे विशेष संचालक विनीत अग्रवाल यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या ईडीच्या तपास अधिकाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने कार्यमुक्त करण्याच्या निर्णयामुळे अग्रवाल यांना हटवण्यात आलं आहे.
१९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या अग्रवाल यांची जानेवारी २०१७ मध्ये ईडीत प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. २९ मार्चला ईडीचे संयुक्त संचालक सत्यव्रत कुमार यांना नीरव मोदी चौकशी प्रकरणातून हटवल्यानंतर अग्रवाल चर्चेत आले होते. मुंबईतील ईडीचा विशेष संचालक पश्चिम विभागाचा प्रमुख असतो. त्याच्याकडे महाराष्ट्रासह, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड इत्यादी राज्यांतील चौकशी जबाबदारी असते. अग्रवाल यांना हटवल्यानंतर मुंबईच्या संचालकांचा कारभार चेन्नईतील विशेष संचालकांकडे सोपवण्यात आला आहे. अग्रवाल यांना गृह विभागात पाठवण्यात आलं असून त्यांचा कार्यकाळ देखील ३ वर्षांनी कमी करण्यात आला आहे.
मुंबई - नीरव मोदी प्रकरण : ईडीच्या मुंबई प्रमुखांची हकालपट्टी https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) April 17, 2019