नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्का प्रकरणातील मुकेश सिंहने दया याचिका दाखल केली होती. ती याचिका दिल्लीसरकारनंतर आता उपराज्यपाल अनिल बैजल यांनी निर्भया प्रकरणातील दोषी गुन्हेगार मुकेश याची दया याचिका फेटाळली आहे. आता त्याची दयेची याचिका गृह मंत्रालयात राष्ट्रपतींकडे पाठविण्यात येणार आहे. या दया याचिकेवर आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे अंतिम निर्णय देतील.संबंध देशाचं निर्भया प्रकरणातल्या दोषींच्या फाशीकडे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, मुकेशच्या दया याचिकेमुळे दोषींची फाशी पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. या दोषींना २२ तारखेला फाशी देणं शक्य नाही असं दिल्ली सरकारने म्हटलं आहे. मुकेश या दोषीने दयेची याचिका दाखल केल्याने ठरविलेल्या तारखेला फाशी देणं शक्य नाही. या प्रकरणात चार आरोपींना पटियाला कोर्टाने दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, ही फाशी लांबणीवर टाकण्यासाठी आरोपी आपले सर्व कायदेशीर उपायांचा अवलंब करत आहेत. त्यामुळे कायदेशीर अडचण निर्माण होऊन फाशीच्या शिक्षेला उशीर होणार आहे. दोषींना फाशीची शिक्षा माफ व्हावी म्हणून राष्ट्रपतींकडे दयेची याचिका करण्याचा अधिकार आहे. मात्र, ही याचिका फेटाळल्यानंतरच शिक्षेवर अंमलबजावणी करता येते. त्यामुळे राष्ट्रपतींचा निर्णयावर फाशीची शिक्षा अवलंबून आहे.
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार नराधमांपैकी एक नराधम मुकेश याने १५ जानेवारी रोजी कोर्टात फाशीच्या शिक्षेविरोधात याचिका दाखल केली होती. दिल्ली सरकारने त्याची दया याचिका फेटाळल्यानंतर आज गुरुवारी उपराज्यपाल अनिल बैजल यांनी देखील मुकेशचा दयेचा अर्ज फेटाळला. त्यांनी पुढील निर्णयासाठी गृह मंत्रालयाकडे हा अर्ज सोपविला आहे. आता राष्ट्रपती शेवटचा निर्णय घेतील.