चलनातून बाद झालेल्या २५ लाख ८० हजारांच्या नोटा पकडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 04:53 PM2020-01-22T16:53:42+5:302020-01-22T16:55:26+5:30

नोटांसह तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने कटकटगेट परिसरात पाठलाग करून पकडले

The old currency was seized of Rs 25 lacks in Aurangabad | चलनातून बाद झालेल्या २५ लाख ८० हजारांच्या नोटा पकडल्या

चलनातून बाद झालेल्या २५ लाख ८० हजारांच्या नोटा पकडल्या

googlenewsNext
ठळक मुद्देटक्केवारीवर नोटा विकणारे तिघे ताब्यात आरोपी पकडताना गुन्हे शाखेचे अधिकारी जखमी

औरंगाबाद : चलनातून बाद ठरलेल्या २५ लाख ८० हजारांच्या नोटांसह तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने कटकटगेट परिसरात पाठलाग करून पकडल्याची थरारक घटना सोमवारी सायंकाळी घडली. मंगळवारी दुपारी जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  

शेख उमर शेख गुलामनबी (३७, रा. रेणुकामाता मंदिराशेजारी, जाधववाडी), शेख मोईन शेख मुनीर (३५, रा. कांचनवाडी, जामा मशिदीच्या बाजूला), सय्यद अझरुद्दीन सय्यद अहेमद (३७, रा. इंदिरानगर, बायजीपुरा) असे छापा टाकून पकडलेल्या तिघांचे नाव आहे. चलनातून बाद ठरलेल्या नोटा विक्री करण्यासाठी तिघे जण ग्राहक शोधत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक गौतम वावळे यांच्या पथकाने सापळा रचून कटकटगेट परिसरात पाळत ठेवली. संशयित रिक्षा (एमएच-२० बीटी-९७६०) कटकटगेटकडे येताना दिसली. त्यात तिघे जण बसलेले होते. खबऱ्यानुसार पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा करताच आरोपी नोटा घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. वावळे यांच्यासह पथकाने पाठलाग करून आरोपींना पकडले. त्यांची झडती घेतली असता हजार आणि पाचशेच्या नोटा आढळून आल्या. तिन्ही आरोपींनी या नोटा कुठून आणल्या, कुणाला विकणार होते? याविषयीचे कोडे सुटलेले नाही. 
अधिकारी जखमी
शेख उमर हा रिक्षाचालक गाठोडे घेऊन पळू लागला, त्याचा पाठलाग करताना उडी मारून पकडण्याचा प्रयत्न करताना शेख उमर आणि सहायक पोलीस निरीक्षक गौतम वावळे हे दोघेही खाली पडले. त्यामुळे वावळे यांच्या हातात रस्त्यावरील दगड लागून उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. तरीदेखील उमरला नोटांसह ताब्यात घेतले. हातावरील जखमीला तीन ते चार टाके पडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी
जप्त केलेल्या नोटांमध्ये १००० रुपयांच्या ९८० नोटा, ५०० रुपयांच्या ३२०० नोटा अशा, एकूण २५ लाख ८० हजार रुपयांच्या या बाद झालेल्या नोटा आहेत. विक्री करणारे रॅकेट पकडण्यासाठी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त मीना मकवाना,               सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गौतम वावळे, सहायक फौजदार शेख नजीर, रामदास गायकवाड, पोहेका. सतीश जाधव, चंद्रकांत गवळी, पोलीस नाईक सुधाकर राठोड, सुधाकर मिसाळ, रवींद्र खरात, आनंद वाहूळ आदींनी ही कारवाई केली आहे. 

दोन रिक्षाचालक :  शेख उमर शेख गुलामनबी, सय्यद अझरुद्दीन सय्यद अहेमद हे दोघे रिक्षाचालक असून, यांच्याकडे बाद नोटा आल्या कुठून, त्यांना कुणी दिल्या आहेत. या मागचे रॅकेट नेमके कोण, अशा विविध प्रश्नांचे उत्तर पोलिसांना मिळालेले नाही. या बाद नोटांच्या मूल्यांच्या २५ टक्के दलाली घेऊन त्यांची नोटा विकण्याची तयारी सुरू होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

एक आरोपी प्लॉट विक्रेता : शेख मोईन शेख मुनीर याचा कांचनवाडी परिसरात प्लॉट विक्रीचा व्यवसाय आहे. ही रक्कम प्लॉटिंगमध्ये आली की, कुणाकडून ती बदलून देण्याची प्रक्रिया राबविली जात होती. किती दिवसांपासून हा उपक्रम सुरू आहे. यापूर्वी हेराफेरीचे गुन्हे दाखल आहेत काय, इत्यादी प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत. 

Web Title: The old currency was seized of Rs 25 lacks in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.