जळगाव : कानळदा जाणारी बस लागल्याचा समज होऊन बस पकडण्यासाठी गेलेल्या देवकाबाई नारायण सपकाळे (७०, रा.कानळदा, ता.जळगाव) या वृध्देचा मनमाड आगाराच्या मनमाड-भुसावळ बसच्या पुढील चाकाखाली आल्याने चिरडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता नवीन बसस्थानकात घडली. पाय घसरल्याने वृध्दा खाली पडली व त्याचवेळी बसचे चाक तिच्या डोक्यावरुन गेले, अशी माहिती महामंडळाच्या सूत्रांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवकाबाई नारायण सपकाळे, लिलाबाई व्यंकट सोनवणे (रा.लाडली, ता.धरणगाव) व सिंधूबाई मुरलीधर कोळी (रा.चिंचोली, ता.यावल) या तिघं बहिणी चाळीसगाव येथे लिलाबाई सोनवणे यांची नात जागृती युवराज कोळी हिच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले होत्या. गुरुवारी हा कार्यक्रम झाल्यानंतर शुक्रवारी सकाळीच आपआपल्या गावाला जाण्यासाठी बसने जळगावात आल्या. सिंधूबाई यांची बस लागल्याने लिलाबाई या त्यांना बसपर्यंत सोडण्यासाठी गेल्या, जातांना मोठी बहिण देवकाबाई यांना जागेवरच थांबायला सांगितले होते. सिंधूबाई यांना सोडून परत आल्यावर देवकाबाई जागेवर नव्हत्या, कुठे गेल्या म्हणून शोध घेत असतानाच मनमाड-जळगाव बसच्या मागे एक महिला पडलेली दिसली, पातळवरुन ही बहिणच असल्याची खात्री झाल्यावर जवळ जावून पाहिले असता बहिणच होती व डोक्यातून मेंदू बाहेर आलेला होता. हा प्रकार पाहून लिलाबाई यांनी एकच आक्रोश केला.