मुंबई - पोलिसांचा खबरी म्हणून काम करणाऱ्या एकाला अटक करुन त्यांच्याकडून तब्बल ४७० ग्रॅम हेराईन जप्त केल असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत १ कोटी ४१ लाख रुपये इतकी आहे. खालीद वसी खान (वय ५१, रा. शैलेश नगर,मुंब्रा) असे त्याचे नाव असून अमली पदार्थविरोधी पथकाच्या वरळी कक्षाने त्याला डॉकयार्ड रोड स्टेशन परिसरात त्याला अटक केली.
महाविद्यालयीन तरुण व उच्चवर्गीय मंडळीच्या पार्टीसाठी ते वितरीत करण्यात येणार होते. खान हा पोलिसांचा खबरी म्हणून काम करताना गुंडाकडून खंडणीही वसुल करीत असल्याची माहिती तपासातून स्पष्ट झाल्याचे विभागाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितले. ‘एएनसी’पथकातील सहाय्यक निरीक्षक अमर मराठे, सुदर्शन चव्हाण हे डॉकयार्ड रोड रेल्वे स्टेशन रोडसमोर माझगाव येथे मंगळवारी रात्री गस्त घालित असताना बस स्टेशन रुट क्रं.४४ येथे खान हा संशयास्पदरित्या फिरत असलेला आढळून आला. त्याला हटकून त्याच्याकडील लाल रंगाच्या रॅगझिनची पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये ४७० ग्रॅम हेराईन जप्त केली. त्याची किंमत अंदाजे १ कोटी ४१ लाख इतकी आहे.
खालिद खान हा २००० ते २००३ या कालावधीत अमली पदार्थविरोधी पथकाकडे खबरी म्हणून काम करीत होता. त्याचबरोबर तो स्वत: ड्रग पेडलरचे काम करीत होता. त्यावेळी पथकाने त्याच्यासह ७ जणांना गांजाची विक्री करीत असताना अटक केली होती. या खटल्यातून त्याची काही महिन्यापूर्वी निर्दोष मुक्तता झाली होती.