ठाणे - वाघ, बिबटय़ा आणि मगर यांच्या कातडय़ासह दोन हस्तीदंताची तस्करी करणाऱ्या मुंबईतील समीर शांताराम जाधव (37) याला गुरूवारी ठाणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. तसेच त्याच्याकडून हस्तगत केलेल्या ऐवजाची किंमत ४५ लाख रुपये असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंदाजे किंमत दोन कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. तसेच वाघ हे विदर्भात असल्याने त्याचा विदर्भाशी काही कनेक्शन आहे याचा ही शोध घेण्यात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी गुरूवारी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ठाण्यातील बाळकुम - माजिवाडा रोडवर वन्यजीव प्राण्याचे कातडे व हस्तीदंताची तस्करी करत एक जण त्याची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती.त्यानुसार, गुरूवारी दुपारी वन अधिकाऱ्यांसह खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून मुंबईतील मालाड येथे राहणाऱ्या समीर याला ताब्यात घेतले. तो व्यवसायाने वाहन चालक आहे. तसेच त्याच्याकडून जप्त केलेल्या वाघ आणि बिबटय़ांची कातडय़ावरून ते लहान असण्याची शक्यता आहे. तर, मगरमध्ये भुसा भरण्यात आलेला आहे. त्याने हे कातडे आणि हस्तीदंत कुठून आणले. तसेच तो कोणाला विकण्यासाठी आला होता. तसेच तो सराईत आहे का? याबाबत शोध घेण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायदा 1971 चे कलम 9,39,44,48 (अ),49,49 (अ), 51 प्रमाणो गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. तसेच त्याला शुक्रवारी ठाणो न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे उपायुक्त देवराज यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस निरीक्षक विकास घोडके, पोलीस उपनिरीक्षक विकास बाबर, हेमंत ढोले, रोशन देवरे, विलास कुटे, सहायक पोलीस निरीक्षक भिवणकर या पथकाने केली.