दोन बोटे छाटली, महिला सहाय्यक आयुक्त पिंपळेंवर फेरीवाल्याचा जीवघेणा चाकूहल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 10:24 PM2021-08-30T22:24:42+5:302021-08-30T23:35:51+5:30
Crime News : पिंपळे यांची दोन तर बचाव करणाऱ्या अंगरक्षकाचेही एक बोट कापले, फेरीवाला पोलिसांच्या ताब्यात
ठाणे : कासावडवली भागातील मार्केट परिसरात अनाधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या माजिवडा मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत त्यांच्या हाताची दोन बोटे कापली गेली आहेत. तर त्यांना वाचविण्यासाठी पुढे सरसावलेल्या अंगरक्षकावर देखील हल्ला झाला असून त्याचे देखील एक बोट कापले गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर आता येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर या प्रकरणी हल्ला करणाऱ्या फेरीवाल्याला कासारवडवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना सोमवारी सांयकाळी ६.३० च्या सुमारास घडली.
घटनेत हल्ला करणाऱ्या अमरजीत यादव याला पोलिसांनी मोठय़ा शिताफीने अटक केली आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सध्या शहरातील अनाधिकृत बांधकामांपाठोपाठ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार मागील आठवडय़ापासून ही कारवाई सुरु आहे. सोमवारी अशाच प्रकारे माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यासह त्यांच्या पथकाने घोडबंदर भागातील कासारवडवली येथील मुख्य मार्केटमध्ये पदपथ आणि रस्ते अडविणा:या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. सांयकाळी ६.३० च्या सुमारास ही कारवाई सुरु होती. त्याच वेळेस एका फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी पथक पुढे सरसावत असतानाच संतप्त झालेल्या फेरीवाल्याने, रागाच्या भरात पिंपळे यांच्यावर चाकू हल्ला केला.
फेरीवाल्याने त्यांच्या डोक्यावर चाकू भिरकवला असता, त्याच वेळेस हल्यापासून बचाव करण्यासाठी पिंपळे यांनी डोक्यावर हात ठेवला, त्यात हा हल्ला त्यांच्या हातावर झाला आणि त्यामध्ये त्यांच्या डाव्याहाताची दोन बोटे कापली गेली ती तुटुन खाली पडली. तर या हल्याचा बचाव करण्यासाठी पुढे सरसावलेल्या त्यांच्या अंगरक्षकाच्याही डाव्या हाताचे एक बोट कापले गेले. तर यावेळी येथील स्थानिक नागरीक आणि बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्या फेरीवाल्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीस आपल्याला पकडण्यासाठी पुढे येत असल्याचे समजताच त्याने तोच चाकू आपल्या गळ्यावर ठेवून त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला. परंतु काही वेळ चालणाऱ्या या थरारनाटय़ानंतर अमरजीत यादव या फेरीवाल्याला मोठय़ा शिताफीने पकडून कासारवडली पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. या फेरीवाल्याची गाडी जप्त केल्यानेच त्याचा राग मनात धरुन हा हल्ला झाला असावा असा प्राथमिक अंदाज आता वर्तविण्यात आला आहे. या प्रकरणी रात्री उशिरार्पयत कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.