व्याजाने पैसे देणार्या सावकराला अटक; कोंढव्यातील ११ व्या मजल्यावरुन फेकून खुनाचे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 04:16 PM2020-03-18T16:16:58+5:302020-03-18T16:17:18+5:30
व्याजाने पैसे देताना तारण म्हणून ठेवतो त्यांची मौल्यवान चिजवस्तू, वाहने
पुणे : व्याजाने दिलेले पैसे परत न केल्याबद्दल तिघा जणांनी तरुणाला ११ व्या मजल्यावरुन फेकून देऊन खुन केला होता. या प्रकरणात व्याजाने पैसे देणार्या सावकराला कोंढवापोलिसांनीअटक केली आहे.
सुहास शरद धांडेकर (वय ३०, रा. कोंढवा बु़) असे या सावकराचे नाव आहे. सुहास धांडेकर याच्याविरुद्ध व्याजाने दिलेले पैसे परत न दिल्याबद्दल मारहाण केल्याचा गुन्हा कोंढवा पोलिसांकडे दाखल आहे.
सुहास धांडेकर हा सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थ्यांना महिना १० टक्के व्याजाने पैसे दिले आहेत. तसेच त्यांना व्याजाने पैसे देताना तारण म्हणून त्यांची मौल्यवान चिजवस्तू, वाहने ठेवतो.
अभिनव नारायण जाधव, अक्षय गोरडे आणि तेजस गुजर यांनी कुल उत्सव सोसायटीच्या ११ व्या मजल्यावरुन फेकून देऊन सागर चिलेवरी याचा खुन केला होता. हा प्रकार १० मार्च रोजी मध्यरात्री पावणे दोन वाजता घडला होता. आरोपी अभिनव जाधव याच्याकडून सागर चिलेवरी याने १५ हजार रुपये व्याजाने पैसे घेतले होते. पैसे व व्याज परत देत नाही, या कारणावरुन तिघांनी सागर याला स्वारगेट येथून मोटारसायकलवर बसवून कुल उत्सव सोसायटीत आणले होते. तेथे मारहाण करुन त्याला ११ व्या मजल्यावरुन ढकलून देऊन त्याचा खुन केला होता.
या प्रकरणात आरोपी व साक्षीदारांनी दिलेल्या माहितीवरुन या गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल धांडेकर याच्या सांगण्यावरुन साक्षीदारांनी घटनास्थळावरुन हलविली होती़. त्यामुळे धांडेकर याने गुन्ह्यातील पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे निष्पन्न झाले़ पोलिसांनी तांत्रिक पुरावा, बँक स्टेटमेंट प्राप्त करुन घेतले़ त्यावरुन धांडेकर याला अटक केली आहे.
आरोपी शरद धांडेकर याने अनेकांना व्याजाने पैसे दिले आहेत. त्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. ज्यांना शरद धांडेकर याने व्याजाने पैसे दिले आहेत़ व चिजवस्तू तारण म्हणून ठेवल्या आहेत. त्यांनी कोंढवा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त सुनिल कलगुटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, हवालदार भोसले, गवळी, नाईक,कांबळे, कुंभार, पांडुळे, वणवे, शेख, मिसाळ यांनी केली आहे.