वानवडीत पूर्ववैैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करुन एकाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 12:01 PM2018-12-25T12:01:06+5:302018-12-25T12:06:47+5:30
पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून चौघा जणांनी तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खुन केला़.
पुणे : पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून चौघा जणांनी तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खुन केला़. ही घटना वानवडीतील शांतीनगर समोरील काटवनात सोमवारी रात्री अकरा वाजता घडली़. ख्रिसमस साजरा करत असताना हा प्रकार घडला़.
खन्ना परदेशी (वय ४०, रा़. वानवडी बाजार) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे़. याप्रकरणी सबॅस्टीन सॅम्युअल जॉन (वय ३१, रा़. वानवडी व्हिलेज, वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे़. वानवडी पोलिसांनी बबलू ऊर्फ हैदर परदेशी (रा़. सर्व्हट क्वार्टस पद्मव्हिला सोसायटीसमोर, वानवडी), अक्षय विनोद कांबळे (रा़ .वानवडी बाजार) आणि त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़. खन्ना आणि परदेशी, कांबळे हे मित्र असून ते पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत़. वानवडी पोलिसांनी हैदर परदेशी याला अटक केली आहे़.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, आरोपी अक्षय कांबळे व बबलु परदेशी यांच्याबरोबर खन्ना याचा ऑक्टोबर २०१८ मध्ये वाद झाला होता़ यावेळी खन्ना याने दगडाने मारहाण करत कांबळे याला शिवीगाळ केली होती़. सबॅस्टीन व खन्ना हे दोघे सोमवारी रात्री काटवनात दारु पीत बसले होते़. त्यांची दारु संपल्यानंतर त्यांनी आणखी दारु आणून पिली़. त्यानंतर त्यांना झोप लागली़. रात्री सबॅस्टीन याला मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडाने जाग आली़. तेव्हा कांबळे, परदेशी व अन्य दोघे जण तेथे दिसले़. अक्षय कांबळे याने सबॅस्टीन याला मारण्याचा प्रयत्न केला़. पण तो पळून गेला़. त्यानंतर त्यांनी खन्ना याच्यावर पालघरने वार करुन त्याचा खुन केला़.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील, पोलीस निरीक्षक रावसाहेब भापकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली़. सहायक पोलीस निरीक्षक एस. आर. शिंदे अधिक तपास करत आहेत.