पुणे : खंडणासाठी खडकवासला येथे एकावर गोळीबार करणार्यांपैकी एकाला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केल . ही घटना रविवारी रात्री खडकवासला परिसरात घडली होती. उदय उर्फ विक्या महेंद्र सोनवणे (वय २०, रा. किरकटवाडी) अटक केलेल्याचे नाव आहे.गोळीबारात विजय उर्फ खंडू लक्ष्मण चव्हाण (वय २५, रा. रायकर मळा, धायरी) जखमी झाले आहेत. याप्रकरणी राजू सोनवणे यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू सोनवणे यांचा इलेक्ट्रिक साहित्यनिर्मितीचा व्यवसाय आहे. ते खडकवासला परिसरातील लांडगे वस्ती येथे राहायला आहेत. सोनवणे यांच्याकडे चेतन लिमन याने ५० हजार रुपयांची खंडणी मागितली होती. विजय चव्हाण यांचा खडकवासला चौपाटीवर हातगाडी असून ते इतरवेळी राजू सोनवणेकडे कामाला असतात.रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास विजय चव्हाण त्यांच्याकडे आले होते.ते घराबाहेर बोलत थांबले असताना मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यात गोळीबारात राजू ऐवजी विजय गंभीर जखमी झाले होते.त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी तातडीने पथक तयार करुन हल्लेखोरांचा माग काढण्यास सुरुवात केली. हल्लेखोर उदय सोनवणे हा नांदेड फाटा येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने इतर साथीदारांच्या मदतीने गोळीबार केल्याची कबुली दिली. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट, रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, दत्तात्रय जगताप, विजय कांचन, दत्तात्रय तांबे, गुरु जाधव, अमोल शेंडगे, एम. एस. भगत, धीरज जाधव यांच्या पथकाने केली.चेतन लिमन याच्या टोळीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार व २ वर्षांपासून फरार असलेला अदित्य बाळकृष्ण गायकवाड (वय २१, रा. कोल्हेवाडी, सिंहगड रोड)याला पकडून हवेली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.