नालासोपारा (मंगेश कराळे) :- संतोष भवन येथील परिसरात एक गावठी कट्टा, दोन जीवंत काडतुसांसह एका आरोपीला तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी रविवारी दुपारी पकडले आहे. जियालाल जैस्वाल (४५) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल करून ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून हा आरोपी गावठी कट्टा नालासोपारा शहरात कोणाला विकण्यासाठी आला होता याचा तपास करत आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष भवन येथील स्मशान भूमीजवळ एक आरोपी गावठी कट्टा, जीवंत काडतुसांसह उत्तर प्रदेश येथून येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी सापळा लावला होता. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक संशयास्पद दिसल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतल्यावर एक गावठी कट्टा आणि दोन जीवंत काडतुसे सापडली. तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल करून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे असा एकूण ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
एका आरोपीला अग्नीशस्त्र व जिवंत काडतुसांसह पकडले आहे. गुन्हा दाखल करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला वसई न्यायालयात हजर करणार आहे. - शैलेंद्र नगरकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे)