शिक्षिकेची ऑनलाइन फसवणूक; गमावले सहा लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 07:29 AM2021-06-30T07:29:59+5:302021-06-30T07:30:23+5:30
बोरीवलीत राहणाऱ्या शिक्षिकेच्या बँक खात्यातून पैसे लंपास करण्यात आले होते. याबाबत तक्रार मिळाल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी २० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ऑनलाइन फसवणुकीत शिक्षिकेच्या बँक खात्यातून जवळपास ६ लाख ५ हजार रुपये लंपास करण्यात आले. या प्रकरणी समतानगर सायबर सेलने दोन विदेशी नागरिकांना साेमवारी अटक केली. आयोनील रुचिनल (४८) आणि बुडूई अलीन (३६) अशी अटक आराेपींची नावे आहेत. दोघेही व्यवसायाने मॅकेनिकल इंजिनीअर आहेत.
बोरीवलीत राहणाऱ्या शिक्षिकेच्या बँक खात्यातून पैसे लंपास करण्यात आले होते. याबाबत तक्रार मिळाल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी २० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. ज्यात त्यांना आरोपींच्या कारचा क्रमांक सापडला. ती कार कांदिवलीच्या लोखंडवाला परिसरात पार्क केल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी सापळा रचत आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून क्लोनिंग मशीन, कॅमेरा, चिप इत्यादी हस्तगत करण्यात आले.