मुंबई : ओशिवऱ्यातील एका फ्लॅटमध्ये विकी गांजी (३३) या तरुणाचा मृतदेह सोमवारी रात्री सापडला होता. त्याच्या छातीवर गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी त्याच्या वडिलांना अटक केली आहे. त्यांनीच संपत्तीच्या वादातून मुलाची हत्या केल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
श्रीनिवास गांजी असे अटक आरोपीचे नाव आहे. तो टॅक्सीचालक म्हणून काम करतो. व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेला विकी घटस्फोटित असून त्याला नशेचे व्यसन होते. सध्या तो बेरोजगार होता आणि वडील तसेच लहान भावासोबत नर्मदा को-आॅप. हाउसिंग सोसायटीत चार खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहत होता. विकीच्या खोलीतून मोठ्ठा आवाज आला आणि मी तेथे धावत गेलो, तेव्हा तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसल्याचे श्रीनिवासने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहिले. तसेच आसपासच्या लोकांकडेही चौकशी केली. मात्र हा प्रकार घडला तेव्हा कोणीच त्या फ्लॅट वा इमारतीमधून आत-बाहेर गेल्याचे सीसीटीव्हीत आढळले नाही. त्यामुळे पोलिसांचा श्रीनिवासवरील संशय बळावला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बापलेकात गेल्या अनेक वर्षांपासून संपत्तीवरून वाद होते. तसेच श्रीनिवासला काही वाईट नाद होते. अनेकदा तो घरी येताना महिलांना घेऊन यायचा. त्यावरून त्यांच्यात भांडण होत असल्याचे तपास अधिकाऱ्यांना समजले. त्यातूनच त्याने अखेर विकीची हत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
त्यानुसार ओशिवरा पोलिसांनी श्रीनिवास याला अटक केली आहे. विकीने स्वत:च स्वत:वर गोळी मारून आयुष्य संपविले, असे तो पोलिसांना सांगत होता. मात्र विकीच्या छातीवर असलेली गोळीबाराची जखम ही त्याने स्वत:हून केलेल्या गोळीबाराप्रमाणे नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यानुसार अधिक चौकशी करत श्रीनिवासच्या स्कुटीमधून गोळीबारासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल पोलिसांनी हस्तगत केले आहे.
ओशिवरा पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या नर्मदा को-आॅप. हाउसिंग सोसायटीच्या इमारत क्रमांक तीनमधील फ्लॅटमध्ये विकी जखमी अवस्थेत सापडला. श्रीनिवास यानेच पोलिसांना कळविले. त्यानुसार ओशिवरा पोलिसांनी त्याला कूपर रुग्णालयात हलविले. तेव्हा डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी ओशिवरा पोलीस तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ९ ने तपास सुरू केला.