ठाणे : पूर्ववैमनस्यातून दीपक उर्फ दीपू रेवणकर (25, रा. सिद्धार्थनगर, कोपरी, ठाणे) या गुंडावर कोपरीतील सिद्धार्थनगर भागात दोन भावांनी पोटावर चॉपरचे वार करुन खूनाचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरीतील सिद्धार्थनगर भागातून 22 सप्टेंबर रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास रेवणकर हा जात होता. त्यावेळी त्याचा विशाल चेकालिया (20) आणि विकास चेकालिया (17) या दोन्ही भावांशी वाद झाला. याच वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. त्याचवेळी विशालने रेवणकर याच्या पोटात चाकूने वार केले. तर विकासने लोखंडी सळईने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे तो रक्ताच्या थारोळयात खाली कोसळला. त्याला गंभीर जखमी अवस्थेत त्याच्या भावाने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दोन्ही भावांनी जुना वाद उकरुन त्याच्याशी भांडणो केल्याचा आरोप आहे. तर रेवणकर याच्यावरही कोपरी पोलीस ठाण्यात याआधी हाणामारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या हल्ल्यानंतर विकास आणि विशाल हे दोघेही पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांनी सांगितले. जमादार तुकाराम डुंबरे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
सुशांतच्या मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता, सीबीआय आणि एम्सच्या टीमची उद्या महत्वपूर्ण बैठक
फेलिक्स दहाल हत्या प्रकरण सीबीआयकडेही प्रलंबितच, आईकडून चिंता व्यक्त
नवीन पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी स्वीकारला पदभार