- शशिकांत ठाकूर
कासा : पालघर जिल्ह्यात दोन साधू व त्यांचा चालक यांना चोर समजून जमावाने त्यांची हत्या केल्याने राज्यासह देशभर त्याचे पडसाद उमटले होते. या घटनेला १६ एप्रिल रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. दरम्यान, या प्रकरणात एकूण २८८ जणांना अटक केली असून, त्यामध्ये २० जण अल्पवयीन होते, तर आतापर्यंत एकूण १९४ आरोपींना जामीन झाला असून, अद्याप तपास सुरू आहे.डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेशालगत असलेल्या दुर्गम भागातील गडचिंचले येथे रात्रीच्या वेळी १६ एप्रिल रोजी चोर समजून कल्पवृक्षगिरी महाराज (७०), सुशीलगिरी महाराज (३५), या दोन साधू आणि त्यांचा चालक नीलेश तेलवडे (३०) यांची २५० ते ३०० जणांच्या जमावाने पोलिसांसमक्ष निर्घृण हत्या केली होती. यानंतर २० एप्रिलला कोकण पोलीस महानिरीक्षकांनी साधूंची हत्या रोखण्यासाठी अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून तात्काळ कासा पोलीस ठाण्याचे दोन अधिकारी आनंदराव काळे व पोलीस उपनिरीक्षक सुधीर कटारे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. २८ एप्रिल रोजी कासा पोलीस ठाण्यातील आणखी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले गेले, तर ३५ पोलीस कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात बदली करण्यात आली.लाॅकडाऊन काळात हे साधू मुंबईच्या कांदिवलीवरून सुरत येथे अंत्यविधीसाठी जात असताना ही घटना रात्रीच्या वेळी गडचिंचले येथे घडली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता व पोलीस यंत्रणेवर झालेले आरोप यामुळे घटनेचा तपास सीआयडीकडे देण्यात आला होता.
जंगलात लपलेल्या आरोपींचा ड्रोनच्या साहाय्याने तपासपोलिसांनी सुरुवातीला ११० आरोपींना पकडले; परंतु परिसरात जंगल असल्याने इतर आरोपी आजूबाजूच्या जंगलात लपले होते. त्यामुळे त्यांचा शोध ड्रोनच्या साह्याने घेण्यात आला. यावेळी गडचिंचले गावात व परिसरात मोठ्या प्रमाणात फौजफाटा दाखल करण्यात आला होता. गावाला छावणीचे स्वरूप आले होते. १३ मे रोजी सदर खटल्यात भाईंदर येथील वकील दिग्विजय त्रिवेदी हे साधूच्या पक्षात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने बाजू मांडण्यासाठी डहाणू येथे न्यायालयात येत असताना महामार्गावर मेंढवण येथे अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता.