पालघर - पालघरमध्ये पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत चिल्हार फाटा येथे स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला आहे. जिलेटिन आणि डिटोनेटरने भरलेल्या दोन पिकअप व्हॅन पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
ज्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्या ठिकाणाहून 20 किलोमीटरच्या अंतरावर संवेदनशील असे तारापूर अणुशक्ती केंद्र आहे. तसेच नुकतेच वसई तालुक्यातील चांदीप येथे जिलेटिन आणि डिटोनेटरचा मोठा साठा जप्त केल्याची घटना ताजी असतानाच तब्बल दोन पिकअप व्हॅन भरून स्फोटकांचा साठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अहमदाबाद महामार्गावरील चांदीप आणि सायवन येथे वाळू माफियांच्या घरांवर आणि अड्ड्यावर छापे टाकून मोठ्या प्रमाणावर स्फोटके जप्त केली. पोलिसांनी केलेल्या कारावई १२३ जिलेटीनच्या कांड्या, ३४५ नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्सच्या आणि २१ सेफ्टी फ्जुजचे बंडले जप्त करण्यात आली होती.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात हायअलर्ट जारी असताना स्फोटकांचा साठा पालघर पोलिसांच्या हाती लागला आहे. अशातच मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चिल्हार फाटा येथे स्फोटकांचा मोठा साठा येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर शाखेने ही कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी जिलेटिन आणि डिटोनेटरने भरलेल्या दोन पिकअप व्हॅनसह त्यांच्या चालकांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून दोन्ही चालकांची कसून चौकशी सुरू आहे.