पालघर साधू हत्याकांड प्रकरण, १४ आरोपींना जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 05:25 AM2021-06-30T05:25:51+5:302021-06-30T05:57:12+5:30
पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गडचिंचले येथे वाट चुकलेल्या कल्पवृक्ष गिरी (७०), सुशीलगिरी महाराज (३५) आणि त्यांचा चालक नीलेश तेलगडे (३०) यांची १६ एप्रिल २०२० रोजी जमावाने निर्घृण हत्या केली होती.
पालघर : डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे दोन साधू आणि त्यांच्या कारचालकाची हत्या प्रकरणात मंगळवारी १४ आरोपींना ठाण्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला, तर अन्य १८ आरोपींचे जामीन फेटाळून लावले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० जुलै रोजी होणार आहे.
पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गडचिंचले येथे वाट चुकलेल्या कल्पवृक्ष गिरी (७०), सुशीलगिरी महाराज (३५) आणि त्यांचा चालक नीलेश तेलगडे (३०) यांची १६ एप्रिल २०२० रोजी जमावाने निर्घृण हत्या केली होती. या तिहेरी हत्याप्रकरणी आतापर्यंत २०१ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यापैकी ७५ जणांना मुख्य आरोपी करण्यात आले आहे. त्यापैकी काही आरोपींना ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाने १५ हजारांच्या जातमुचलक्यावर आधीच जामीन मंजूर केला होता, तर इतर आरोपींच्या जामिनावर सुनावणी होऊन मंगळवारी १४ आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला. याचवेळी न्यायालयासमोर सुनावणीस आलेल्या या घटनेतील १८ इतर आरोपींचा जामीन नामंजूर करण्यात आला. अतिरिक्त सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर.एस. गुप्ता यांच्यासमोर ही सुनावणी झाली.