कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांच्या सुपारी देण्यामागे पदोन्नतीच्या कारणाने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 08:09 PM2021-10-08T20:09:23+5:302021-10-08T20:11:34+5:30

Firing Case : अमित याने अजय सिंह सोबत मिळून उत्तर प्रदेश येथून दोन शस्त्र खरेदी केली.

Panic Situation over promotion of Executive Engineer Deepak Khambit | कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांच्या सुपारी देण्यामागे पदोन्नतीच्या कारणाने खळबळ

कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांच्या सुपारी देण्यामागे पदोन्नतीच्या कारणाने खळबळ

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांनी अमित सिन्हाला उत्तर प्रदेशच्या भदोई येथून ताब्यात घेतले. त्या नंतर ५ ऑक्टोबर रोजी राजू विश्वकर्मा आणि प्रदीप पाठकला अटक केली.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांच्या हत्येसाठी २० लाख रुपयांची सुपारी पालिकेचेच दोन कनिष्ठ अभियंता यशवंत देशमुख व श्रीकृष्ण मोहिते यांनी पालिका ठेकेदार राजू विश्वकर्माला दिली. सुपारी मागे पदोन्नती आणि चांगला विभाग, पद खांबीत यांच्यामुळे मिळत नसल्याचे खळबळजनक कारण पोलिसांनी समोर आणले आहे. शहराच्या इतिहासात अधिकाऱ्यांनीच अधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी द्यावी असा प्रकार पहिल्यांदाच तोही पदोन्नती आदी कार्यालयीन कारणांनी  घडल्याने चिंता व चिंतनाची गरज व्यक्त होत आहे .

दीपक खांबित हे बोरिवली येथील घरी जात असताना २९ सप्टेंबर रोजी नॅशनल पार्क येथील कृष्णा इमारतीसमोर दुचाकी वरून पाठलाग करत असलेल्या अजय सिंह व अमित सिन्हा यांनी गाडीवर दोन गोळ्या झाडल्या होत्या. खांबीत त्यात सुदैवाने बचावले. बोरिवलीच्या कस्तुरबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन मुंबई पोलिसां सह मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांनी  तपास सुरू केला होता.

मीरा भाईंदर - वसई विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते व गुन्हे शाखेचे उपायुक्त डॉ महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रमोद बडाख व अविराज कुराडे , सहायक निरीक्षक नितीन विचारे, उपनिरीक्षक सुर्वे व पथकाने सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषणे , महितीगार व त्यांच्या तपास कौशल्याने वेगाने तपास केला. हल्लेखोरांसह सुपारी देणारे अधिकारी, ठेकेदार आदींच्या मुसक्या आवळत अवघ्या ५ - ६ दिवसात गुन्ह्याची उकल केली. मुंबई पोलिसांनी सुद्धा तपासासाठी १० पथके नेमून परिश्रम घेतले.

लोकमतने सर्वात आधी हल्लेखोर, ठेकेदारास अटक केल्याचे तसेच पालिकेच्या देशमुख व मोहिते या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त व सुपारी मागची प्राथमिक शक्यता वर्तवली होती. पालिका अधिकाऱ्यावर गोळीबारचे प्रकरण जेवढे खळबळजनक होते पण त्यापेक्षा जास्त धक्कादायक त्या मागचे सुपारी देणारे अधिकारी आणि कारण निघाले आहे. दीपक खांबीत हे महापालिकेतील अतिशय वजनदार व दबदबा असलेले अधिकारी म्हणून ओळखले जातात.

खांबीत यांच्या आडकाठी मुळे पदोन्नती मिळत नाही तसेच त्यांच्या मुळे महत्वाची पदं - विभाग मिळत नसल्याने सुपारी दिल्याची कारणे समोर आली असून मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुद्धा अश्याच कारणांचा उलगडा करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ठेकेदार राजू विश्वकर्मा याने खांबीत यांच्या हत्येची सुपारी देशमुख व मोहिते कडून घेतली. २० लाख रुपयांची सुपारी पैकी १० लाख विश्वकर्मा ने घेतले. त्याने त्याच्या परिचयातील सराईत गुन्हेगार अमित सिन्हा उर्फ एलपी याला  खांबीतचा गेम करण्याचे काम सोपवले. शिवाय त्यासाठी लागणाऱ्या अग्निशस्त्र, वाहन आदी करिता पैसे दिले. अमित याने अजय सिंह सोबत मिळून उत्तर प्रदेश येथून दोन शस्त्र खरेदी केली. एक दुचाकी नात्यातल्याची घेतली तर एक दुचाकी खरेदी केली.

पोलिसांनी अमित सिन्हाला उत्तर प्रदेशच्या भदोई येथून ताब्यात घेतले. त्या नंतर ५ ऑक्टोबर रोजी राजू विश्वकर्मा आणि प्रदीप पाठकला अटक केली. ६ रोजी यशवंत देशमुख व श्रीकृष्ण मोहितेला अटक केली. नंतर अजय सिंह ला उत्तर प्रदेशच्या गाझिपुर येथून पकडून आणले आहे. अमित हा नुकताच जेलमधून सुटून आला होता.  त्याची व राजुची ओळख होती. राजू सोबत हल्लेखोर असायचे . गोळीबार केल्या नंतर त्या मध्यरात्री हल्लेखोर राजू कडे गेला होता असे सूत्रांनी सांगितले. विश्वकर्मा हा स्वतःची संस्था चालवण्यासह आंदोलने करायचा, तक्रारी - माहिती अधिकार अर्ज करायचा तसेच  पालिकेच्या बांधकाम विभागात ठेकेदारी करत होता.

सार्वजनिक शौचालय देखभाल तसेच कोरोना काळात जेवण आदीचे काम विश्वकर्माला खांबीतयांच्या मार्फत मिळाल्याचे सांगितले जाते. पण नंतर जेवण पुरवण्याचे कंत्राट त्याच्या कडून गेले. पुन्हा काम मिळाले तोवर कोरोना ओसरला. शौचालय देखभालीचे कंत्राट सुद्धा हातचे गेल्याने खांबीत यांची सुपारी घेण्यामागे या आणखी एक कारणाची शक्यता वर्तवली जात आहे. या सुपारी व हल्ल्या मागे अजून पर्यंत तरी कोणत्याही गँगस्टर टोळीचा तसेच राजकीय हात असल्याचे समोर आलेले नाही. परंतु पोलिसांकडून सुपारीमागे समोर आलेल्या कारणांसह सर्वच शक्यता तपासल्या जात आहेत.

आरोपी अमित सिन्हा हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर मुंबई, भाईंदरच्या नवघर, नवी मुंबई आदी भागात हत्येचा प्रयत्न, गोळीबार आदी स्वरूपाचे तब्बल १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो बांगुर नगर पोलीस ठाण्यातील २०१३ सालच्या हत्येचा प्रयत्न प्रकरणी अटक होता. मार्च २०२१ मध्ये माफीचा साक्षीदार बनून सुटला. राजू विश्वकर्मा वर शहरात ३ गुन्हे तर श्रीकृष्ण मोहिते वर १ गुन्हा दाखल आहे.

 

Web Title: Panic Situation over promotion of Executive Engineer Deepak Khambit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.