कोल्हापूर : ज्येष्ठ नेते काॅम्रेड गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणी शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयात दोष निश्चिती करण्यात येणार होती, त्यासाठी १० संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले; मात्र याबाबतची सुनावणी पुढील तारखेला घ्यावी, अशी विनंती सरकार पक्षातर्फे करण्यात आली. त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी दोष निश्चितीसाठी २३ ऑगस्टला सुनावणीचे आदेश दिले.
ज्येष्ठ नेते पानसरे यांच्या खूनप्रकरणी शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयात १० संशयितांना हजर ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार बंगळूरू येथील कारागृहातून अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, भारत कुरणे, अमित डेगवेकर, अमित बद्दी, गणेश मिस्कीन या सहाजणांना कर्नाटक पोलिसांनी हजर केले. पुण्यातील येरवडा कारागृहातून डाॅ. वीरेंद्र तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे या तीन संशयिताना दुपारी न्यायालयात हजर केले. यापूर्वीच जामिनावर सुटलेला आणखी एक संशयित समीर गायकवाड असे एकूण दहा संशयित न्यायालयासमाेर हजर होते.
संशयित सारंग अकोळकर व विनय पवार अद्यापही फरार आहेत. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. शिवाजीराव राणे यांनी या गुन्ह्याचा तपास एटीएसकडे वर्ग करण्याची पानसरे कुटुंबीयांची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली, पण त्या आदेशाची प्रत अद्याप प्राप्त झाली नसल्याने त्या आदेशात नेमके काय म्हटले आहे हे माहीत नाही. त्यामुळे येथील सुनावणीसाठी पुढील तारीख द्यावी, अशी विनंती न्यायालयास केली. त्यावर संशयित आरोपींचे वकील ॲड. समीर पटवर्धन यांनीही हरकत घेतली नाही. त्यामुळे न्यायालयाने दि. २३ ऑगस्टला सुनावणी होईल असे स्पष्ट केले.