Parambir Singh : परमबीर सिंग यांनी क्रिकेट बुकिकड़ून उकळले ३.४५ कोटी; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 04:05 PM2021-05-03T16:05:50+5:302021-05-03T16:06:51+5:30
Parambir Singh : परमबीर यांच्यावर दिवसेंदिवस आरोपांवर आरोप केले जात आहेत. त्यातच आता या आरोपाने सिंग यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.
मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचा आरोप करणारे पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्यावरच आता पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. क्रिकेट बुकी सोनू जालान याने परमबीर सिंग यांच्यावर हे आरोप केले आहेत. २०१८ साली परमबीर सिंग यांनी मोक्का लावून माझ्याकडून ३ कोटी ४५ लाख रुपये वसूल केले. याशिवाय, सोनू जालान याने पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि कोथमिरे यांच्यावरही आरोप केले आहेत. तसेच परमबीर यांच्यावर दिवसेंदिवस आरोपांवर आरोप केले जात आहेत. त्यातच आता या आरोपाने सिंग यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.
यासंदर्भात सोनू जालान याने पोलीस महासंचालक संजय पांडे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलीस महासंचालकांनी हे प्रकरण तात्काळ राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. केतन तन्ना या व्यक्तीनेही परमबीर सिंग यांनी खंडणी वसूल केल्याचा आरोप केला आहे. परमबीर सिंग यांनी आपल्याकडून १ कोटी २५ लाख रुपये उकळले. याप्रकरणी परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यांची चौकशी व्हावी. याप्रकरणात आम्ही दोषी आढळलो तर आमच्यावर कारवाई करा, पण आम्हाला न्याय द्या, अशी मागणी केतन तन्ना यांनी केली आहे.
Param Bir Singh: "आमचा रोल संपला, आता उच्च पातळीवर चौकशी सुरू"; अखेर परमबीर सिंगांवर गुन्हा दाखल
परमबीर यांच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह राज्य पोलिस दलातील अनेक पोलीस अधिकारी गुन्हेगारी षडयंत्रात सहभागी असल्याचा आरोप असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी बुधवारी दिवसभर राज्य पोलिस दलातील शिर्षस्थ अधिकारी तसेच गृहमंत्रालयातील शिरस्थानचे प्रदीर्घ मंथन झाले. त्यानंतर अकोला जिल्हा पोलिस प्रशासनाला गुन्हा दाखल करण्यासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला. या पार्श्वभूमीवर परमवीर सिंग तसेच अन्य ३२ अशा एकूण ३३ जणांविरुद्ध बुधवारी अकोल्यात गुन्हा दाखल झाला.
या प्रकरणातील फिर्यादी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमराज रोहिदास घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्याचे पोलिस महासंचालक तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह पोलीस दलातील अन्य वरिष्ठांकडे काही दिवसांपूर्वी तक्रार पाठवली होती. या तक्रारीत घाडगे यांनी परमबीर सिंग आणि अन्य ३२ जणांनी गुन्हेगारी षडयंत्र रचून आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा गंभीर आरोप केला होता.