मुंबई - लोकलच्या आवाजाच्या दिशेने खेळता खळता गच्चीपर्यंत पोहचलेल्या दीड वर्षाच्या चिमुरडीचा तोल जाऊन ती खाली कोसळली. यातच तिचा मत्यू झाल्याची धक्कादायक घटना काळाचौकीमध्ये घडली. आरोही राणे असे चिमुरडीचे नाव आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मृतदेह केईएम रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
चिंचपोकळी परिसरातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आरोही आई वडील आणि १० वर्षाच्या बहिणीसोबत राहते. आज दुपारी २ च्या सुमारास घराबाहेर खेळत असताना, ती गायब झाली. आरोही गायब झाल्याचे लक्षात येताच, कुटुंबियांनी तिचा शोध सुरु केला. तासाभराने कुटुंबियांनी काळाचौकी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, काळाचौकी पोलीस ठाण्याचे २० ते २५ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी इमारतीतील प्रत्येक घरांचा शोध घेतला. मात्र मुलीचा काहीच थांगपत्ता लागला नाही. अखेर, सायंकाळी साडे पाचच्या सुमारास इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील बाल्कनीच्या शेडवर ती जखमी अवस्थेत मिळून आली. तिला तात्काळ जवळच्या केईएम रुग्णालयात नेले. तेथे तिला मृत घोषित करण्यात आले.
आरोहीला रांगायची सवय होती. ती रांगत रांगत जिन्यावर जात असे. दुपारी देखील ती रांगत रांगत गच्चीवर पोहचली. लोकलच्या आवाजाच्या दिशेने येत असताना तिचा तोल गेला. आणि ती खाली कोसळल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. तिचे रांगण्याच्या खुणा दिसून येत आहे. तिच्या अंगावर कुठल्याही स्वरुपाच्या अत्याचाराच्या खुणा दिसून आलेल्या नाही. याप्रकरणी अपघाती मत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक पोपट आव्हाड यांनी दिली.आज दुपारी २ वाजताच्या सुमारास १ वर्ष ८ महिन्यांची मुलगी हरविल्याबाबत तिला अज्ञात महिलेने उचलून नेले असून मुलीबाबत माहिती मिळाल्यास किंवा दिसल्यास डॉक्टर कंपाउंड अथवा काळाचौकी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याबाबत माहिती असलेला मेसेज व्हॉट्स अप ग्रुप आणि फेसबुकवर चिमुकलीच्या फोटोसह पोस्ट वायरल करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या २ तासांनंतर हरवलेल्या चिमुकलीचा मृतदेह इमारतीत सापडला.