कोलकाता : एअर एशियाचे कोलकाताहून मुंबईला झेपावलेल्या विमानाचे आज आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. यानंतर लगेचच सुरक्षा दलांनी विमानाला घेराव घातला. कोलकाता विमानतळावर हा थरार रंगला होता.
एअर एशियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने विमानाने उड्डाण करताच त्याच्याकडे स्फोटके असल्याचा दावा केला. तसेच त्याने वाईट परिणाम भोगायला तयार रहा अशी धमकीही दिली. यामुळे कोलकाता विमानतळाच्या नियंत्रण कक्षाने विमानाला उतरविण्याचे आदेश दिले.
विमानात स्फोटके असल्याचा संदेश आल्यानंतर सुरक्षा दलांची धावपळ उडाली. विमान धावपट्टीवर उतरताच त्यांनी घेराव घातला. यानंतर या धमकी देणाऱ्या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे स्फोटके असल्याचा दावा खोटा असल्याचे समोर आले. मात्र, सुरक्षा अधिकाऱ्यांकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.