मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकलमधून प्रवास करण्यावर निर्बंध आले आहेत. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा आहे. परंतु याच संधीचा फायदा घेत मुंबईत काही टोळक्यांनी बनावट तिकीट तपासनीस बनून प्रवाशांना लुटण्याचे धंदे सुरू केले आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभाग तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी रेल्वे सुरक्षा बल आणि जीआरपी च्या मदतीने गेल्या ८ महिन्यांत म्हणजे जानेवारी ते ऑगस्ट २०२१ दरम्यान उपनगरीय स्थानकांवर/गाड्यांमधून ५ बनावट तिकीट तपासनीस पकडले आहे.
अलीकडे, १३ ऑगस्ट रोजी दादर येथील हेड टीसी सुखवीर जाटव यांनी एका व्यक्तीला प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर प्रवाशांकडून तिकीट तपासताना पाहिले, त्यांना संशय आला आणि त्यांनी त्याला ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. तेव्हा त्या व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण अखेरीस त्याला पकडण्यात आले आणि पुढील कारवाईसाठी जीआरपीच्या ताब्यात देण्यात आले.
दुसऱ्या घटनेत ४ मे रोजी रोजी 02538 डाउन विशेष कुशीनगर एक्सप्रेसच्या डी1 डब्यातील प्रवाशांना एक व्यक्ती पावती देत होता व पैसे स्वीकारत होता. सीनियर टीटीई अनंत कुमार यांनी चौकशी केली असता त्यांना आढळले की, तो बनावट टीसी आहे आणि त्याच्याकडे बनावट ईएफआर होता. त्यालाही जीआरपीकडे सोपवण्यात आले. तसेच २८ एप्रिल रोजी कल्याण स्थानकावरील टीटीई हरिमंगल यादव यांनी कल्याण स्टेशनवरील 01071 विशेष कामायनी एक्सप्रेस मध्ये डी1 डब्यातील बनावट टीसी शोधला.
१५ मार्चला कुर्ला येथील हेड टीसी सिकंदरजीत सिंग आणि सायन स्थानकावरील हेड टीसी सुश्री वाघचौरे यांनी शीव स्टेशनवर बनावट टीसी शोधला. त्याच दिवशी, सँडहर्स्ट रोड स्थानकावरील सीनियर टीसी राजू गुजर यांनीही बनावट टीसी पकडला. वरील सर्व बनावट टीसी पुढील कारवाईसाठी जीआरपी कडे देण्यात आले. त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या विविध कलमांखाली एफआयआरही दाखल करण्यात आला.