शेतकरी आंदोलनातील लोकांनी एकाला जिवंत जाळले, वादाचं धक्कादायक कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 03:58 PM2021-06-17T15:58:38+5:302021-06-17T15:58:53+5:30
Farmers Protest: शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांनी एका व्यक्तीला जिवंत जाळल्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नवी दिल्ली - केंद्र सरकारने पारीत केलेल्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या सात महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर तसेच इतर ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, या आंदोलनाबाबत वेगवेगळ्या बातम्या समोर येत असतात. (Farmers Protest)दरम्यान, आता या आंदोलनातून अशीच एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. हरियाणामधील बहादूरगड येथे शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांनी एका व्यक्तीला जिवंत जाळल्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मृत व्यक्तीचे नाव मुकेश असून, तो कसार गावातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. (The people in the farmer's movement burnt one person alive)
मुकेश याने काल संध्याकाळी शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या चार जणांसोबत आंदोलनस्थळीच मद्यप्राशन केले होते. त्यानंतर त्यांच्यात वादावादी झाली. त्या वादातून आरोपींनी मुकेश याच्यावर तेल ओतून आग लावली. आगीत गंभीररीत्या होरपळलेल्या मुकेशला बहादूरगड येथील रुग्णालयात आणण्यात आले. मात्र ९० टक्के भाजलेल्या मुकेशने अडीचच्या सुमारास प्राण सोडले.
दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक लोकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांकडून आपल्याला त्रास देण्यात येत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. तसेच मृताच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिला. पीडित कुटुंबाला नुकसानभरपाई आणि सरकारी नोकरीसोबतच सुरक्षेची हमी सरकारने द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तसेच आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना गावापासून दूर नेऊन बसवण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. सध्या डीएसपी पवन कुमार हे घटनास्थळी कुटुंबीयांची समजूत काढण्यामध्ये गुंतले आहे. सध्या पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करून घेतला आहे तसेच आरोपींचा शोध सुरू केला आहे. तसेच मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यासाठी आवश्यक कारवाईलाही सुरुवात केली आहे.