मुंबई : आलिया भटच्या वादग्रस्त ठरलेल्या ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटातील ‘कामाठीपुरा’, ‘काठियावाडी’ आणि ‘चायना’ हे तीन शब्द हटवण्यासंदर्भात करण्यात आलेल्या तीन याचिका उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळल्या.काँग्रेसचे आमदार अमिन पटेल, हितेन मेहता यांनी स्वतंत्र जनहित याचिका दाखल केल्या होत्या. तर कामाठीपुराच्या रहिवासी श्रद्धा सुर्वे यांनी रिट याचिका दाखल केली होती. या तिन्ही याचिकांवरील सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होत्या. हा चित्रपट प्रदर्शित करण्यास स्थगिती द्यावी, अशी कोणीही मागणी केली नाही. केवळ या चित्रपटातील तीन आक्षेपार्ह शब्द हटविण्याची विनंती याचिकादारांनी केली आहे.
सुर्वे यांनी याचिकेत म्हटले आहे की, चित्रपटात कामाठीपुराचे नाव घेऊन या ठिकाणी राहणाºया लोकांची बदनामी होईल. पूर्वी येथे वेश्यालये होती. पण आता तसे नाही. तर पटेल यांची वकील धृती कपाडिया यांनी न्यायालयाला सांगितले की, चित्रपटात ‘काठियावाडी’ आणि ‘कामाठीपुरा’ हे शब्द वापरून लोकांच्या भावनांचा दुखावण्यात आल्या आहेत. कामाठीपुरातील अनेक रहिवाशांनी पटेल यांना पत्र लिहून या चित्रपटातून ‘कामाठीपुरा’ हा शब्द हटविण्याची विनंती केली आहे. चित्रपटात दाखविल्याप्रमाणे संपूर्ण कामाठीपुरा हा ‘रेड लाईट’ चा भाग नाही. तर मेहता यांच्या वकिलांनी चायना या शब्दावर आक्षेप घेतला.
या तिन्ही याचिकांवर संजय लीला भन्साळी यांच्यातर्फे जेष्ठ वकील रवी कदम यांनी केला. या तिन्ही याचिका चुकीच्या समजावर दाखल करण्यात आल्या आहेत. या चित्रपटात १९५० चा काळ दाखविण्यात आला आहे. त्याकाळात त्या भागात चायनाचे अनेक डेन्टिस्ट होेते. त्यांना उद्देशून हा शब्द वापरण्यात आला आहे. तसेच चित्रपटाच्या सुरुवातीलाच सूचना देण्यात आली आहे की, हा चित्रपट कोणत्याही व्यक्तीच्या किंवा समुदायाच्या भावना दुखावण्यासाठी नाही. चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी केल्यानंतर याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केली आहे. हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने मंजुरी दिली आहे, असा युक्तिवाद कदम यांनी केला. न्यायालयाने सर्वांचा युक्तिवाद केल्यानंतर तिन्ही याचिका फेटाळल्या