तक्रारकर्त्या महिलेला आरोपी करण्यासाठी आरोपीची न्यायालयात याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 11:47 AM2018-09-12T11:47:06+5:302018-09-12T11:50:39+5:30
अकोला : अकोल्यातील किडनी तस्करी प्रकरणाने राज्यासह देशपातळीवर खळबळ उडविल्यानंतर या प्रकरणातील आरोपीने तक्रारकर्त्यांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल के ली आहे.
अकोला : अकोल्यातील किडनी तस्करी प्रकरणाने राज्यासह देशपातळीवर खळबळ उडविल्यानंतर या प्रकरणातील आरोपीने तक्रारकर्त्यांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल के ली आहे. यासंदर्भात न्यायालयाने जुने शहर पोलिसांना नोटीस बजावली असून, त्यांची बाजू मांडण्यासाठी २४ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.
किडनी तस्करी प्रकरणातील आरोपी देवेंद्र सिरसाट याने जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल केली असून, या याचिकेनुसार ‘ट्रान्सप्लान्टेशन आॅफ आॅर्गेन्स टिशू अॅक्ट’ १९९४ नुसार किडनी खरेदी करणारा व मध्यस्थी करणाऱ्यासोबतच विकणाºयाविरुद्ध न्यायालयात गुन्हा सिद्ध होत असेल, तर आरोपीला १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद असून, एक कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. या कलमानुसार तक्रार करणारी महिलाही तेवढीच दोषी आहे. म्हणून तिलाही आरोपी करण्यात यावे, ही याचिका न्यायालयाने विचारात घेतल्यानंतर जुने शहर पोलिसांना त्यांची बाजू मांडण्यासाठी २४ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. ३१ डिसेंबर २०१५ रोजी जुने शहर पोलीस ठाण्यात राहुल नगरातील हरिहरपेठ येथील निवासी शांताबाई रामदास खरात यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार आरोपी देवेंद्र सिरसाटने शांताबाई खरातला उधार पैसे मागितल्यानंतर त्याने म्हटले होते, की जर किडनी विकली, तर एका किडनीच्या बदल्यात पाच लाख रुपये मिळतील. या आमिषाला बळी पळून त्याने शांताबाईची भेट बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील मांडवा येथील विनोद पवार याच्याशी करून दिली होती. त्यानंतर औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी केल्यानंतर नांदुरा येथील झांबड यास किडनी प्रत्यारोपण करण्यात आले; मात्र पवार व सिरसाट यांनी शांताबाई यांना पाच लाख रुपयांऐवजी तीन लाख रुपये दिले होते. त्यामुळे फसवणूक झाली म्हणून शांताबाईने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४१७, ३४ नुसार गुन्हे दाखल केले होते. आणखी एक तक्रारकर्ता समोर आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपास केल्यानंतर कलम ४६५, ४६८, ४७१, ३७० वाढविले होते.