अयोध्या-मथुरेत बॉम्ब फोडू, शीर धडावेगळं करू, राज्यातील भाजपा आमदार विजय देशमुख यांना PFI ची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 02:47 PM2022-10-08T14:47:39+5:302022-10-08T14:48:19+5:30
Vijay Deshmukh: घटनेच्या एका सदस्याने भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांना शीर धडावेगळं करण्याची धमकी दिल्याची बाब उघड झाली आहे. भाजपा आमदार विजय देशमुख यांनी त्यांना पीएफआय सदस्यानं धमकीचं पत्र पाठवल्याचा दावा केला आहे.
मुंबई - काही दिवसांपूर्वी केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईनंतर पीएफआय या कट्टरतावादी संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. दरम्यान, या संघटनेच्या एका सदस्याने भाजपा आमदार विजय देशमुख यांना शीर धडावेगळं करण्याची धमकी दिल्याची बाब उघड झाली आहे. भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांना पीएफआय सदस्यानं धमकीचं पत्र पाठवल्याचा दावा केला आहे.
करण्यात येत असलेल्या दाव्यानुसार या पत्रामधून विजय देशमुख यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच अयोध्या आणि मथुरेमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकीही या पत्रामधून देण्यात आली. काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली पीएफआयवर बंदीची कारवाई करण्यात आली होती. तत्पूर्वी या संघटनेची कार्यालये आणि सदस्यांवर छापेमारी करून शेकडो जणांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान, या प्रकरणी भाजपा आमदार विजय देशमुख यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. यामध्ये देशमुख यांनी पीएफआय नेते मोहम्मद शफी बिराजदार यांच्यावर आरोप केले आहेत. पीएफआयवर बंदी घातल्याने संतप्त होऊन त्यांनी शीर घडावेगळे करण्याची धमकी दिल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.
दरम्यान. या पीएफआय सदस्याने आत्मघाती हल्लेखोरांकडून अयोध्येतील राम मंदिर आणि मथुरेतील कृष्ण जन्मभूमीसारख्या हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्याची धमकी दिल्याचा आरोपही या तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा यांच्यासह अन्य नेते रडारवर असल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आल्याचेही देशमुख यांनी तक्रारीत म्हटले आहे.
सरकारने पीएफआयवर बंदी घालून योग्य केलेले नाही. आता त्याचे परिणाण भोगावे लागतील. एवढंच नाही, तर पत्रामध्ये सिमीचाही उल्लेख आहे. सध्या सोलापूर पोलीस या प्रकरणाची आणि पत्राची सत्यता तपासत आहेत.