रेमडेसिविर काळ्याबाजारप्रकरणी औषधी कंपनीचा अधिकारी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 04:20 AM2021-04-19T04:20:18+5:302021-04-19T04:20:31+5:30
दमणमधील घटना; रेमडेसिविरच्या १८ कुपी जप्त
वलसाड (गुजरात) : रेमडेसिविरच्या काळ्याबाजारप्रकरणी दमणस्थित औषधी कंपनीच्या एका बड्या अधिकाऱ्यासह दोन जणांना जेरबंद करण्यात आले आहे. मनीष सिंह (कंपनीचे तांत्रिक संचालक) आणि वरुण कुंद्रा (फर्निचर दुकान मालक) अशी त्यांची नावे आहेत, असे वलसाडचे जिल्हा पोलीस अधीक्षक राजदीप झाला यांनी रविवारी सांगितले.
वलसाड जिल्ह्यातील वापीमधून या दोघांना १५ एप्रिल रोजी अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रेमडेसिविरच्या १८ कुपी (वायल)जप्त करण्यात आल्या आहेत. वरुण कुंद्रा कोणत्याही परवान्याशिवाय रेमडेसिविर भरमसाठ किमतीने विकत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वलसाड पोलिसांनी सापळा रचला. एका रुग्णाचा नातेवाईक असल्याचे सांगून आमचा एक पोलीस कुंद्राला भेटला. कुंद्रा १२ हजार रुपयांप्रमाणे रेमडेसिविरचे एक इंजेक्शन विकण्यास राजी झाला. कुंद्राने रेमडेसिविरची एक वायल दाखविताच दुसऱ्या पोलिसाने त्याला पकडले. आपला मित्र मनीष सिंहकडून रेमडेसिविर खरेदी केल्याचा दावा कुंद्राने केला. नंतर मनीष सिंहला एका ग्राहकासाठी रेमडेसिविरच्या आणखी सहा वायल घेऊन इकडे बोलाविण्यास कुंद्राला सांगितले.
रेमडेसिविरच्या सहा वायल घेऊन मनीष सिंह घटनास्थळी पोहोचताच त्यालाही जेरबंद करण्यात आले. काही फर्निचर खरेदी करण्यासाठी सिंह हे अलीकडेच कुंद्राच्या दुकानात गेले होते. तेव्हा सिंह हे कुंद्राच्या संपर्कात आले होते. रेमडेसिविरला मोठी मागणी असल्याने कुंद्राने झटपट मोठी कमाई करण्याचा बेत आखून सिंहकडून रेमडेसिविरच्या १२ वायल खरेदी केल्या.
गुन्हा दाखल
रेमडेसिविर विक्रीचा किंवा साठा करण्याचा मनीष सिंहकडे परवाना नव्हता.अत्यावश्यक वस्तू अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि औषधी व प्रसाधने अधिनियमानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.