झटपट ५ लाख कमवण्यासाठी उसाच्या फडात गांजा लावला; 'उद्योग' पुरता फसला!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 06:45 PM2022-07-23T18:45:54+5:302022-07-23T18:46:52+5:30

Solapur : वटवटे (ता. मोहोळ) येथील ढोबळे वस्ती येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात उसाच्या पिकामध्ये चक्क गांजाची लागवड केली होती. ही माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि कामती पोलिसांनी तेथे छापा टाकून उघडकीस आणली.

Planted ganja in sugarcane fields, earn 5 lakhs quickly; Kurul Village, Mohol Taluka, Solapur District | झटपट ५ लाख कमवण्यासाठी उसाच्या फडात गांजा लावला; 'उद्योग' पुरता फसला!

झटपट ५ लाख कमवण्यासाठी उसाच्या फडात गांजा लावला; 'उद्योग' पुरता फसला!

Next

कुरुल : दीड एकर उसातून सरासरी एक लाख ते दीड लाखाच्या आसपास उत्पन्न मिळते. त्यासाठी उसाला वर्षभर सांभाळवं लागतं. पाणी सोडा, खतं टाका, तोडणी व कारखान्याला जाईपर्यंत कटकट आहेच. एवढी कटकट नकोच एका झटक्यात चार-पाच लाख कमविण्यासाठी शेतकऱ्यांनी शक्कल लढवली आणि दीड एकर उसाच्या फडात जागोजागी गांजाचा बिया टाकल्या. पाच महिन्यात गांज्याची वाढही चांगली झाली होती. याची कुणकुण पोलिसांना लागली आणि भांडाफोड झाला. झटपट पैसे कमविण्याच्या नादात तो शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ही घटना आहे मोहोळ तालुक्यातील वटवटे गावातील.

वटवटे (ता. मोहोळ) येथील ढोबळे वस्ती येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात उसाच्या पिकामध्ये चक्क गांजाची लागवड केली होती. ही माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि कामती पोलिसांनी तेथे छापा टाकून उघडकीस आणली. या  कारवाईत अंदाजे ४ लाख ४१ हजार तीनशे रुपये किंमत असलेला  ४४.१३  किलो वजनाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदाशिव दत्तू ढोबळे ( रा.वटवटे, वय ६२ ) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.  दरम्यान कामती पोलिसांनी सदर आरोपीस मोहोळ न्यायालयात हजर केले असता त्यास सोमवारपर्यंत म्हणजे तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना सोलापूर जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यासाठी आदेश व सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि अनिल सनगल्ले यांचे विशेष पथक नेमूणक करून सदर पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सपोनि अनिल सनगल्ले व त्यांच्या पथकाला याबाबत गोपनीय माहिती मिळाली.  वटवटे येथील शेतकरी सदाशिव ढोबळे यांनी आपल्या शेतातील उसाच्या पिकामध्ये गांजासदृश वनस्पतीची लागवड केली असल्याची माहिती मिळाली.

शेतातच वजनकाट्यावर मोजणी..
ती झाडे गांज्याची असल्याचे खात्री झाल्याने सदरची झाडे मुळासह काढून त्याचेसोबत आणलेल्या वजनकाट्यामध्ये वजन केले असता ४४.१३ किलो वजनाचे ४ लाख ४१ हजार तीनशे रुपये किमतीची गांजा वनस्पती मिळून आली. अमली पदार्थ  कामती पोलीस ठाण्याचे सपोनि अंकुश माने यांनी जप्त करून कारवाई केली आहे. याबाबत कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास कामती पोलीस ठाणेचे सपोनि अंकुश माने हे करीत आहेत. 

अधिकाऱ्यांसह दोन पंच, फोटोग्राफर पोहोचले फडात
सपोनि अनिल सनगल्ले व त्यांचे पथक आणि कामती पोलीस ठाण्याचे  सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने व कामती पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कारवाई करण्यासाठी माहिती मिळालेल्या ठिकाणी नायब तहसीलदार लीना खरात, दोन शासकीय पंच, फोटोग्राफर, वजनकाटा असे वाहनासह जाऊन माहितीप्रमाणे शेतातील उसामध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार यांचेसह पाहणी केली असता शेतातील उसाच्या पिकामध्ये ठिकठिकाणी लहान मोठी गांजासदृश झाडांची लागवड केल्याचे दिसून आले.

स्वत:ला गांजा मिळत नसल्याने केली लागवड
आरोपीस गांजा पिण्याचे व्यसन होते. दरम्यान कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये त्याला गांजा मिळत नसल्याने त्याने स्वतःच्या शेतातच गांजाची लागवड केल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Planted ganja in sugarcane fields, earn 5 lakhs quickly; Kurul Village, Mohol Taluka, Solapur District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.